दारूबंदीचा निर्धार : गावकऱ्यांचा मोर्चा


- साटोड्यात अवैध दारूविक्रीविरोधात ग्रामस्थ आक्रमक; पोलिस गस्तीसह कठोर कारवाईची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायत हद्दीत विदेशी व गावठी दारूची राजरोसपणे विक्री होत असल्याने गावातील शांतता भंग पावली असून, कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध दारूविक्रीमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याने याविरोधात आता संपूर्ण गाव एकवटले आहे. बुधवारी ग्रामपंचायतीमध्ये आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमुखाने गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्धार केला.
या ग्रामसभेला साटोडा ग्रामपंचायतीचे सरपंच गौरव अंबादास गावंडे आणि सावंगीचे ठाणेदार विनोद गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी साटोडा व आलोडी परिसरातील ग्रामस्थांनी अवैध दारूविक्रीविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या.
गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्री तसेच दारूनिर्मितीची सखोल चौकशी करून संबंधित दारू विक्रेत्यांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच गावातील संवेदनशील ठिकाणे आणि मुख्य चौकांमध्ये दिवस-रात्र पोलिसांची गस्त वाढवावी, अशीही मागणी करण्यात आली.
महिला, तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न -
दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तींकडून होणाऱ्या त्रासामुळे विद्यार्थी, तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. दारूविक्रीबाबत ग्रामस्थांनी प्रशासन किंवा पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्याची वेळेत दखल घेऊन त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. केवळ कारवाई करून न थांबता गावात एकदा बंद झालेली दारूविक्री पुन्हा सुरू होणार नाही, यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला.
दारूविक्री हद्दपार करेपर्यंत लढा -
साटोडा परिसरातील अवैध दारूविक्री कायमची हद्दपार होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा संकल्प सरपंच गौरव गावंडे यांच्यासह ग्रामस्थांनी केला. गावातील शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि महिला व तरुणींची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामसभेत झालेल्या या निर्णयानंतर आता प्रशासन आणि पोलिसांकडून अवैध दारूविक्रीविरोधात कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे साटोडा व आलोडी परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.




Petrol Price




