भाजपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांची विदर्भ न्यूज एक्सप्रेसला विशेष मुलाखत


- आगामी काळात सर्व निवडणुकांवर भाजपाचा झेंडा फडकविणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनीधी / गडचिरोली :
भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांच्या देसाईगंज (वडसा) येथील जनसंपर्क कार्यालयात विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे संपादक मनिष कासर्लावार यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, जिल्ह्यातील विविध समस्या, जनतेचे प्रश्न व इतर महत्त्वांच्या बाबींवर प्रकाश टाकला. विधानसभा निवडणुकीनंतर किसन नागदेवे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली असून पक्ष संघटन मजबुत करण्याच्या दृष्टीने जोमाने कार्य सुरू केले आहे. यापूर्वी ते जिल्हाध्यक्ष असताना गडचिरोली जिल्ह्यात भाजपाचे संघटन मजबूत केले होते. अनेक कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम नागदेवे यांनी केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे.
मुलाखतीदरम्यान बोलताना किसन नागदेवे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार व नेतृत्वात जिल्ह्यात पक्षाचे कार्य जोमाने सुरू आहेत. आगामी काळात जिल्ह्यातील सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने लढविणार व भाजपाचा झेंडा फडकविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पक्ष संघटन मजबूत करण्यात येत असून कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन व बैठका लावून त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे ध्येयधोरणे समजावून सांगण्यात येत आहेत. कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडून पक्षाची ताकद वाढविण्यात येणार असल्याचे नागदेवे यांनी म्हटले आहे.
सध्या भारतीय जनता पक्ष हा देशात क्रमांक १ चा पक्ष असून आगामी काळात आणखी या पक्षाची ताकद वाढविण्यात येणार आहे. यापूर्वीच्या काळात गडचिरोली जिल्ह्यातील एक लोकसभा व तीनही विधानसभा क्षेत्रावर भाजपाने कब्जा मिळविला होता. शिवाय जिल्हा परिषदेवर तसेच गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेवर सुद्धा भाजपाचा झेंडा फडकविण्यात आला होता. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्र भाजपाच्या हातून निसटल्या गेले ही थोडी खंत आहे. मात्र येणारया काळात अहेरी विधानसभा क्षेत्र सुद्धा भाजपाच्या ताब्यात आणण्याचा कसोसीने प्रयत्न करण्यात येणार आहे. याशिवाय ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा आदी सर्व निवडणुका भाजपाच्या वतीने लढविण्यात येणार असून त्या निवडणुकांमध्ये भाजपाची सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आतापासूनच जोमाने काम सुरू आहे. भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता हा महत्त्वाचा आहे. कार्यकत्र्यांच्या भरोशावरच पक्ष मजबूत होत असतो. त्यामुळे कार्यकर्त्याला महत्त्वाचे स्थान दिल्या जात असल्याचेही ते म्हणाले. यापूर्वी सुद्धा आपण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. आपण जिल्हाध्यक्ष असताना गडचिरोली जिल्ह्यातील लोकसभा, विधानसभा मतदारसंघात भाजपाने प्रतिनिधीत्व केले आहे. शिवाय गडचिरोली व देसाईगंज या दोन्ही नगर परिषदांवर सुद्धा भाजपाने सत्ता स्थापन केली होती. अनेक कार्यकर्ते पक्षाची जुळल्या गेल्याने पक्षीय संघटन सुद्धा मजबूत झाले होते. यापुढेही असेच जोमाने कार्य करून पक्षीय संघटनशक्ती वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
सध्या या जिल्हृयात शेतकरी, कामगार, सुशिक्षित बेरोजगार, ओबीसी समाजाचे आरक्षण आदी महत्त्वाच्या समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी शासन व प्रशासनाकडे पक्षाच्यावतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे हाच पक्षाचा मुख्य उद्देश आहे. भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकारण करीत नसून समाजकारणावर अधिक भर आहे. समाजातील जनतेचे महत्त्वाचे प्रश्न सोडविणे, सामाजिक हित जोपासणे हेच पक्षाचे ध्येय आहे. त्यादृष्टीने पक्षाच्यावतीने आपण सातत्याने काम करीत आहोत, असे नागदेवे यांनी मुलाखतीत म्हटले आहे.
  Print


News - Mulakhat | Posted : 2020-02-13


Related Photos