महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यात जंगली हत्तींचा हौदास : जीवाची पर्वा न करता अनेकजण फोटो काढण्याकरिता रस्त्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : हल्ली अनेकदा आपल्याला जंगलाच्या भागाच्या ठिकाणी हत्ती कळप जाताना येताना दिसतो. त्यामुळे हत्तींची नजर कुठेही पडली तरी आपल्याला कायमच त्यांच्याबद्दल भिती वाटत राहते असाच एक प्रकार भंडारा येथे मोहघाटा परिसरात घडला आहे. जंगली हत्तींची दहशत पाहून आजूबाजूच्या परिसरातील लोकंही रस्त्यावर येऊ लागली आणि आपल्या जीवाची पर्वा न करता हत्तींच्या कळपाचे फोटो आणि व्हिडीओज काढू लागली आहेत.
गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यानंतर हत्तींचा कळप सोमवारी भंडारा जिल्ह्यात दाखल झाला. मंगळवारी या हत्तीचा संचार साकोली तालुक्यातील मोहघाटा जंगलात असून, हत्तींवर वाॅच ठेवण्यासाठी वनविभागाचे विविध पथके जंगलात तैनात आहेत. पश्चिम बंगालच्या सेज संस्थेच्या हत्ती नियंत्रण पथकाचीही मदत घेतली जात आहे. वरिष्ठ वनाधिकारी मोहघाटा जंगलात तळ ठोकून आहेत.
साकोली तालुक्यातील सानगडी वनपरिक्षेत्रात सोमवारी २३ हत्तींचा कळप दाखल झाला. या कळपाने झाडगाव, केसलवाडा, सिलेगाव शेतशिवारातील धान आणि ऊस पिकांचे नुकसान केले. दरम्यान मंगळवारी हत्तीचा कळप मोहघाटा जंगलात पोहोचला. जिल्ह्यात हत्ती दाखल झाल्यापासून वनविभाग त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. मोहघाटा जंगलात वनविभागाचे भंडारा व गोंदिया येथील जलद प्रतिसाद दल, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पथक तळ ठोकून आहेत. या परिसरात असलेल्या किटाडी, गिरोला (जापानी), बरडकिन्ही या गावांना
भंडाराचे उपवनसंरक्षक राहुल गवई मंगळवारी दुपारपासूनच मोहघाटा जंगलात तळ ठोकून आहे. वनविभागाच्या फिरत्या पथकाचे प्रमुख वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे या हत्तींवर वाॅच ठेवून आहेत. हत्तीचा कळप लाखनी आणि साकोली तालुक्यातील मोहघाटा जंगलात असल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हत्ती नियंत्रणासाठी पश्चिम बंगालमधील सेज संस्थेची मदत घेतली जात आहे. सेजचे सदस्य सध्या मोहघाटा जंगलात तळ ठोकून आहे. हत्तीच्या हालचाली आणि मार्गक्रमण यावर त्यांची नजर असून, हत्तीचा कळप कोणत्या दिशेला जाऊ शकतो, याचा अंदाज घेत आहेत.

६० कर्मचाऱ्यांचे पथक तैनात
मोहघाटा जंगलात असलेले हत्ती मानवी वस्तीत शिरणार नाही, याची दक्षता वनविभागाकडून घेतली जात आहे. भंडारा वनविभागाचे सुमारे ६० कर्मचारी जंगल परिसरात तैनात आहेत. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.

दोनशे वर्षांनंतर हत्ती पुन्हा भंडारा जिल्ह्यात
भंडारा जिल्ह्यातील घनदाट जंगलात २०० वर्षांपूर्वी हत्तीचा मुक्त संचार होता. १८२९ मध्ये नवेगाव नागझिरा जंगलात हत्तींचे कळप दिसत होते, असे जाणकार सांगतात. ओडिशा, छत्तीसगढ, गडचिरोली, वडसा आणि नागझिरा असा हत्तीचा प्रवासाचा मार्ग असून आता हत्तीचा कळप भंडारा जिल्ह्यात दाखल झाल्याने सुमारे २०० वर्षांनंतर हत्तींचे आगमन झाले आहे. हत्तींची ही चाैथी पिढी असावी, असे जाणकार सांगतात. सध्या मोहघाटा जंगलात मुक्कामी असलेले हत्ती नागझिरा जंगलात जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos