बहिणीला मारहाण करणाऱ्या भावास १ वर्षाचा कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा


- प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी पंचोली यांचा न्यायनिर्वाळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
बहिणीला मारहाण करणाऱ्या भावास १ वर्षाचा कारावास व ५ हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा गडचिरोलीचे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एच. पी. पंचोली यांनी सोमवार, १३ जानेवारी २०२० रोजी सुनावली आहे. भाष्कर पत्रुजी चलाख (४६) रा. ,खरपुंडी, जि. गडचिरोली असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी भाष्कर चलाख हा ३१ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान दारू पिऊन आरडाओरडा करीत असताना त्याच्या बहिणीने तू नेहमी दारू पिउन येतो, मोहल्ल्यातील लोकांसोबत नेहमी भांडण करतोस असे म्हणून समजाविण्यास गेली असता आरोपीने त्याच्या जवळील बांबूच्या काठीने मारून दुखापत केली. याबाबत फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिस स्टेशन येथे अपराध क्रमांक ४२७/२०१९ भादंवि कलम ३२४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक भाष्कर ठाकरे यांनी पोलिस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आढळून आल्याने सोमवार, १३ जानेवारी २०२० रोजी गडचिरोलीचे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एच. पी. पंचोली यांच्या न्यायालयाने भादंविच्या कलम ३२४ अन्वये १ वर्षाचा कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता योगिता राऊत, कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर म्हणून सुभाष सोरते यांनी काम पाहिले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-13


Related Photos