महत्वाच्या बातम्या

 वैरागडमध्ये बिबट्याचा हल्ला : बोकड ठार


- गोठ्यात बांधलेल्या बोकडावर पहाटे हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : वैरागड येथे बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या बोकडावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना २६ ऑक्टोबर रोजी पहाटे उघडकीस आली. या घटनेत पशुपालक हासन कवडू भानारकर यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वैरागड परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने नागरिक आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हासन कवडू भानारकर यांनी आपल्या गोठ्यात बोकड बांधून ठेवला होता. २६ ऑक्टोबरच्या पहाटे बिबट्याने गोठ्यात शिरून बोकडावर हल्ला केला. या हल्ल्यात बोकडाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या वनरक्षक कावेरी विश्वास यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वनविभागाकडून घटनेची नोंद घेण्यात आली असून, नियमानुसार संबंधित पशुपालकाला आर्थिक नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीती -
वैरागड परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे सांगण्यात येत आहे. आता गोठ्यात बांधलेल्या पशुधनावर हल्ला झाल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे जनावरे सुरक्षित ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

वनविभागाने परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि पशुधनाच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बिबट्याचा वावर असलेल्या भागात रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर जाणे टाळावे तसेच जनावरे सुरक्षित व बंदिस्त गोठ्यात ठेवावीत, असे आवाहनही महत्त्वाचे ठरत आहे.





  Print






Related Photos