विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे भाकित ठरले खरे!


- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आविसंचे अजय कंकडालवार विजयी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार हे विराजमान होणार असल्याचे वृत्त विदर्भ न्यूज एक्सप्रेसने प्रकाशित केले होते. यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले अजय कंकडालवार हे सर्वांना जुळवून घेत असल्याने आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांचे नेतृत्व दमदार असल्याने अध्यक्ष पदासाठी त्यांची दावेदारी भक्कम मानली जात होती. त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनविण्यासाठी बहुतांश जिल्हा परिषद सदस्यांचा पाठींबा असल्याने ते अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग सूकर असल्याचे वृत्त विदर्भ न्यूज एक्सप्रेसने यापूर्वी प्रकाशित केले होते. विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे हे भाकित आज खरे ठरले आहे. आरक्षण बदलानंतर शुक्रवार, ३ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यात आदिवासी विद्यार्थी संघ- काँग्रेसच्या आघाडीने बाजी मारली. अध्यक्षपदी अजय कंकडालवार, तर उपाध्यक्षपदी मनोहर पोरेटी विजयी झाले. या निवडणुकीत भाजपच्या ४ सदस्यांनी आविसं व काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. यामुळे अडीच वर्षे जिल्हा परिषदेवर असलेली भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आविसं- काँग्रेस आघाडीचे अजय कंकडालवार यांना २९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नामदेव सोनटक्के यांना २२ मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आविसं-काँग्रेस आघाडीचे मनोहर पोरेटी यांना २९, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप-राकाँ आघाडीचे युद्धिष्ठिर बिस्वास यांना २२ मते मिळाली. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सकाळी ११ वाजतापासून अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. पीठासीन अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी काम पाहिले. दुपारी २ वाजतानंतर निवडणूक घेण्यात आली. ५१ सदस्यीय जिल्हा परिषदेत भाजप २०, काँग्रेस १५, आदिवासी विद्यार्थी संघ ७, राष्ट्रवादी काँग्रेस ५, अपक्ष (रासप) २ व अपक्ष (ग्रामसभा) २ असे पक्षीय बलाबल आहे. अध्यक्षपदासाठी आविसं-काँग्रेस आघाडीतर्फे अजय कंकडालवार व उपाध्यक्षपदासाठी मनोहर पोरेटी यांनी नामनिर्देशनपत्र सादर केले. भाजप-राकाँ आघाडीतर्फे अध्यक्षपदासाठी नामदेव सोनटक्के, तर उपाध्यक्षपदासाठी युद्धिष्ठीर बिस्वास रिंगणात होते. परंतु अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नीता साखरे, विद्या आभारे, श्रीदेवी पांडवला व शिल्पा रॉय, तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य जगन्नाथ पाटील बोरकुटे, अतुल गण्यारपवार व वर्षा कौशिक (दोन्ही रासप) यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले. यामुळे आविसं -काँग्रेस आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना २९, तर भाजप-राकाँ उमेदवारांना २२ मते मिळाली. ग्रामसभांचे उमेदवार ॲड. लालसू नोगोटी व सैनू गोटा यांनी भाजप-राकाँ उमेदवारांना मतदान केले.
निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षांची ढोल ताशांच्या निनादात रॅली काढून फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार दीपक आत्राम, काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युवक काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महासचिव कुणाल पेंदोरकर, काँग्रेसच्या अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आविसं नेते नंदू नरोटे, रवी सल्लम, बानय्या जनगाम व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-03


Related Photos