नेलगुंडा परिसरातील ५ हजार नागरिकांचा धोडराज पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन


- पोलिसांकडून ग्रामस्थांवर झालेल्या अन्यायाविरोधात प्रचंड आक्रोश

- पोलिसांच्या खोट्या चकमकीचा गावकऱ्यांकडून तीव्र शब्दांत निषेध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
पोलिसांनी अबुझमाड जंगल परिसरात खोटी चकमक दाखवून नक्षलवाद्यांशी कुठलाही संबंध नसताना व ते नक्षल सदस्य नसताना सुद्धा आपली पाठ थोपटण्यासाठी मालेंगा येथील रहिवाशी राजू दस्सा पुसली व नेलगुंडा येथील प्रकाश चुक्कू मुहंदा या दोन सर्वसामान्य नागरिकांची २९ नोव्हेंबर २०१९ रोजी हत्या करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा अन्याय झालेला आहे. पोलिसांच्या दडपशाहीमुळे आदिवासी व दुर्गम भागातील आदिवासी बांधव धास्तावले आहेत. या अन्यायाविरोधात आज, २४ डिसेंबर २०१९ रोजी नेलगुंडा परिसरातील ८ ते १० गावातील जवळपास ४ ते ५ हजार नागरिकांनी एकत्रित होत पायी चालत धोडराज पोलिस स्टेशन गाठून ठिय्या आंदोलन केले. आदिवासींना योग्य न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल व रात्रभर येथेच मुक्काम ठोकण्यात येईल, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यापुढे पोलिसांची दडपशाही कदापीही खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही गावकऱ्यांनी पोलिस विभाग व प्रशासनाला यावेळी दिला आहे. तसेच पोलिसांच्या खोट्या चकमकीचा गावकऱ्यांकडून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
राजू पुसाली व प्रकाश मुहंदा हे दोघेजण गोरखाचे झाड शोधण्यासाठी जंगल परिसरात फिरत असताना पोलिसांनी त्यांना पकडून बेदम मारहाण केली व नक्षल्यांच्या ठिकाणी दाखवून हत्या करण्याची धमकी दिली. त्यानंतर अबुझमाड जंगल परिसरात 29 व 30 नोव्हेंबर रोजी खोटी चकमक दाखवून त्या दोन आदिवासी बांधवांची हत्या करण्यात आली. चकमकीत ठार झालेले नक्षलवादी नसून ते सर्वसामान्य नागरिक होते. त्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर फार मोठा अन्याय झालेला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी नेलगुंडा परिसरातील ८ ते १० गावातील जवळपास ४ ते ५ हजार नागरिक एकत्रित येवून पायी चालत धोडराज पोलिस स्टेशन गाठले. त्यानंतर या पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असून आपण मुक्कामी राहणार असल्याचा निर्धारही गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. नेलगुंडा परिसरातील लोकांच्या आक्रोशामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात गावकरयांनी तहसीलदार भामरागड यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मात्र यावेळी तहसीलदार हजर नसल्याने सदर निवेदन नायब तहसीलदार सिलमवार यांनी स्वीकारले आहे.
या आंदोलनात नेलगुंडा परिसरातील ग्रामसभा नेलगुंडा, भक्कर, मर्दमालेंगा, कवंडे, मिडदापल्ली, गोंगवाडा, परायणार, महाकापाडी, पेनगुंडा, धोडपाडी, दर्भा, दर्भा वेला, हितलवार तसेच कुचेर, मुरंगल, कोयर, भुमेवाडा, बोळंगे, जुव्वी, गोलगुंडा, झारेगुंडा, मोरोमेला आदी गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावकरयांच्या या ठिया आंदोलनामुळे व पोलिसांविरोधात व्यक्त केलेल्या रोषामुळे पोलिस विभागासह प्रशासनामध्ये प्रचंड खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-24


Related Photos