सी - ६० कमांडो किशोर खोब्रागडे यांनी महाराष्ट्र पोलिस व सी - ६० चा नेपाळमध्ये फडकविला झेंडा


- गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
बाईक रायडर म्हणून प्रसिद्ध असलेले गडचिरोली पोलिस दलातील नाईक पोलिस शिपाई किशोर खोब्रागडे हे १२ दिवसांत ३५०० किमी चा खडतर प्रवास करत दुचाकीने नेपाळ देशात जाउन नवा विक्रम घडविला आहे. यामुळे गडचिरोली पोलिस दलाचाच नव्हे तर जिल्हृयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नापोशि किशोर खोब्रागडे हे गडचिरोली पोलिस दलात सन २००७ यावर्षी रुजू झाले असून त्यांनी सन २०१७ मध्ये जम्मू-काश्मिर येथे १३ दिवसांत २४०० किमीचा खडतर प्रवास पूर्ण करून विक्रम घडविला आहे. त्यावेळी त्यांनी अतिशय थंड हवामानाच्या प्रदेशातील खारडोंगला रस्ता (१८,३८०) फूट तागलंगला रस्ता (१७, ५८२) फूट, चांगला रस्ता (१७, ५६६) फूट अवघ्या १३ दिवसात पूर्ण केला होता. त्यांनी आपल्या दुचाकीने १८,३८० फूट उंचीवरून प्रवास केला होता. यावर्षी ते २५ नोव्हेंबर रोजी नेपाळसाठी गडचिरोलीहून रवाना झाले होते. नागपूर -अलाहाबाद-सोनुली-लुंबिनी-पोखरा-काठमांडू-कमलमाई-जनकपूर असा खडतर प्रवास पूर्ण करून त्यांनी पोखरा नेपाळ येथे पॅराग्लाॅयडींग केले. पॅराग्लाॅयडींग करताना त्यांनी महाराष्ट्र पोलिस दल व सी - ६० कमांडोजचा झेंडा नेपाळमध्ये अभिमानाने फडकवािला आहे. पोलिस जवान किशोर खोब्रागडे यांची ही जिद्द व चिकाटी गडचिरोली जिल्हयातील युवकांसाठी प्रेरणादायी असून आपल्यामधील अंगभूत कलागुणांना विकसित करून जिद्द व चिकाटीच्या जोरावर नवीन काहीतरी चांगले करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी ते आदर्श आहे. किशोर खोब्रागडे या जवानांच्या खडतर आणि त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गडचिरोली जिल्हयाचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-10


Related Photos