भारताने बांगलादेशला १०६ धावांत गुंडाळले ; इशांतचे ५ बळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / कोलकाता :
 पहिल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीत भारताने बांगलादेशला पहिल्या डावांत १०६ धावांत गुंडाळले आहे. ३०.३ षटकांत बांगलादेशचा संपूर्ण संघ माघारी परतला. भारताकडून सर्व दहा बळी वेगवान गोलंदाजांनी टिपले. इशांत शर्माने २२ धावांत ५ बळी घेतले तर उमेश यादवने २ आणि मोहम्मद शमीने २ बळी टिपले.
कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर भारत आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळत आहे. आज सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रमुख उपस्थिती राहिली. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र, भारतीय गोलंदाजीपुढे पुन्हा एकदा बांगलादेशची फलंदाजी ढेपाळली.
भारताच्या वेगवान माऱ्यापुढे बांगलादेशच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. पाहुण्या संघाचे ४ फलंदाज तर आपलं खातंही न उघडता माघारी परतले. बांगलादेशचा संघ ३०.३ षटकांत अवघ्या १०६ धावा करून माघारी परतला. यातील २९.३ षटके वेगवान गोलंदाजांनी टाकली तर फक्त एक षटक फिरकीपटू रविंद्र जाडेजाने टाकले. पाहुण्या संघाकडून सर्वाधिक २९ धावा सलामीवीर शादमान इस्लामने केल्या तर लिटन दासने २४ धावा केल्या. शमीचा एक उसळता चेंडू दासच्या हेल्मेटवर आदळला. त्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने दासने मैदान सोडले. दासच्या जागी बदली खेळाडू म्हणून मेहदी हसनचा संघात समावेश करण्यात आला.
बांगलादेश सुरुवातीपासूनच दबावाखाली होता. इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव या त्रिकुटाने टिच्चून मारा केल्याने पहिल्या तासाच्या खेळातच बांगलादेशच्या चार फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट धरावी लागली. १५व्या षटकात बांगलादेशचा अर्धा संघ माघारी गेला होता. तेव्हा धावफलकावर अवघ्या ३८ धावा होत्या. सुरुवातच डळमळीत झाल्याने त्यातून बांगलादेशचा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. बांगलादेशने कशीबशी शंभरीपार मजल मारली.
दरम्यान, मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा ही भारताची सलामीची जोडी मैदानात उतरली असून दोघांनीही दमदारपणे डावाची सुरुवात केली आहे.
  Print


News - World | Posted : 2019-11-22


Related Photos