एसटी बसची दुचाकीला धडक : महिलेचा जागीच मृत्यू, वृद्ध गंभीर


- नागपूर–चंद्रपूर मार्गावरील नंदोरी टोल परिसरात अपघात; वणीहून कोठारीकडे जाताना काळाचा घाला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : नागपूर–चंद्रपूर मार्गावरील नंदोरी टोल परिसरात एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील ७५ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले. ही घटना आज दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास घडली. गीता संतोष पोलनवार ४५,वर्ष रा. कोठारी असे मृत महिलेचे नाव असून, दत्तात्रय कृष्णा रुखमवार ७५, वर्ष रा. मणगाव हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
वणीहून कोठारीकडे जात असताना अपघात -
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय कृष्णा रुखमवार आणि गीता संतोष पोलनवार हे दोघे एमएच २९ सीएन ५४९२ क्रमांकाच्या दुचाकीने वणी येथून कोठारीकडे जात होते. दरम्यान, नागपूर–चंद्रपूर मार्गावरील नंदोरी टोल परिसरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एमएच १४ एमएच १४९७ क्रमांकाच्या बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही खाली पडले. अपघातात गीता पोलनवार यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दत्तात्रय रुखमवार हे गंभीर जखमी झाले.
जखमी वृद्धावर भद्रावतीत उपचार सुरू -
अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रय रुखमवार यांना उपचारासाठी भद्रावती येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वरोरा पोलिसांकडून तपास -
नागपूर–चंद्रपूर मार्गावरील नंदोरी टोल परिसरात घडलेल्या या अपघातामुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अधिकृत तपशील उपलब्ध झालेला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत.




Petrol Price




