महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली-चिमुर मतदारसंघात १ हजार २०५ गृहमतदारांनी केले मतदान


- शंभर वर्षीय मतदाराच्या गृहमतदानासाठी तीन राज्यांच्या सीमेवर पोहचले निवडणूक पथक

विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांची सीमा असलेल्या सिरोंचा येथे वयाची शंभरी गाठलेल्या किष्टय्या आशालू मादरबोईना यांनी गृह मतदान सुविधेअंतर्गत लोकसभा निवडणुक -२०२४ साठी काल आपले मतदान केले. त्यांच्या सोबत किष्टय्या लसमय्या कोमेरा या ८६ वर्षीय वयोवृद्धानेदेखील गृहमतदान केले. हे मतदान घेण्यासाठी अहेरी विधानसभा मतदार संघातील गृह मतदान चमूने अहेरी ते सिरोंचा हे तब्बल १०७ किलोमीटरचे अंतर गाठले व गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर या दोघांचे मतदान नोंदविले. दोघेही वयोवृद्ध एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी गृहमतदानाची निवड करून आपले मत घरातच स्थापन केलेल्या तात्पुरत्या मतदान कक्षात गोपनियता बाळगून नोंदविले.

कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनात ८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात कालपर्यंत ८५ वर्षावरील ९२३ मतदार आणि २८२ दिव्यांग अशा एकूण १ हजार २०५ मतदारांनी आतापर्यंत गृह मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

संपूर्ण मतदार संघातून ८५ वर्षावरील १ हजार ३७ व ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेले ३३८ असे १ हजार ३७५ मतदारांचे गृह मतदानासाठीचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दैने यांनी मंजूर केले आहेत.

विधानसभा मतदार संघनिहाय ८५ वर्षावरील मतदार व झालेले मतदान आणि दिव्यांग मतदार व झालेल्या मतदानाची (कंसात) माहिती पुढीलप्रमाणे आहे. आमगाव- १३३ पैकी १२७ (दीव्यांग-३८ पैकी ३८), आरमोरी -८८ पैकी निरंक (दीव्यांग-५३ पैकी निरंक), गडचिरोली -१३२ पैकी १३२ (दीव्यांग-७० पैकी ७०), अहेरी २३ पैकी २१ (दीव्यांग-१३ पैकी १०), ब्रम्हपुरी २२४ पैकी २२४ (दीव्यांग-६३ पैकी ६३), चिमुर ४३७ पैकी ४१९ (दीव्यांग-१०१ पैकी १०१). याव्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेतील २८ मतदारांचेही अर्ज गृहमतदानासाठी मंजूर करण्यात आले आहे.

सिरोंचा येथील १०० वर्षीय किष्टय्या आशालू मादरबोईना आणि किष्टय्या लसमय्या कोमेरा (८६) यांचे मतदान नोंदविण्यासाठी नायब तहसीलदार जनक काडबाजीवार, क्षेत्रीय अधिकारी सागर भरसट, केंद्राध्यक्ष प्रमोद करपते, सहाय्यक मतदान अधिकारी सुरज आत्राम, पोलीस शिपाई प्रशांत मिसरी, प्रमोद तोटापल्लीवार या मतदान अधिकाऱ्यांनी गृह मतदान घेण्याची कार्यवाही पूर्ण केली असल्याचे अहेरी विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी आदित्य जिवने यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos