महत्वाच्या बातम्या

 एलसीबीची कारवाई : चंद्रपुरात अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन महिला ताब्यात, ३९ हजारांची दारू जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागपूरहून चंद्रपूरकडे खासगी ट्रॅव्हल्समधून अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सावरकर चौक येथे सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ३६ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत ३९ हजार ९२४ रुपये आहे. या प्रकरणात चंद्रपूर येथील प्रिन्स केंजर हा आरोपी पाहिजे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

१५ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या उपविभागीय पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे सावरकर चौक येथे सापळा रचण्यात आला. नागपूरकडून आलेल्या गणराज ट्रॅव्हल्स (क्रमांक एमएच ३४ बीझेड ६७४८) मधून प्रवास करणाऱ्या दोन महिलांची पंचांसमक्ष झडती घेतली असता, त्यांच्या बॅगमध्ये रॉयल स्टॅग विदेशी दारूच्या प्रत्येकी ७५० मिली क्षमतेच्या ३६ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी हा दारूसाठा जप्त करून दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. सन्नो मनोज जाट ५२वर्ष  आणि लक्ष्मी सुरेंद्र जाट ४० वर्ष, दोघीही रा. बेलगाव केंजर मोहल्ला, जबलपूर, मध्य प्रदेश, अशी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, या महिला नागपूर येथून विदेशी दारू आणून चंद्रपूर येथील प्रिन्स केंजर याला विक्रीसाठी देणार होत्या. या प्रकरणातील प्रिन्स केंजर, रा. केंजर मोहल्ला, चंद्रपूर, हा पाहिजे आरोपी असून, त्याचा शोध घेतला जात आहे.या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) आणि ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध दारू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या चंद्रपूर उपविभागीय पथकाने ही कारवाई केली.





  Print






Related Photos