महत्वाच्या बातम्या

 उष्णतेच्या लाटापासून सतर्क राहण्याचे आरोग्य प्रशासनाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. सतत तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा ३ डिग्री सेल्सीअसने तापमानात वाढ झाल्यास किंवा दोन दिवस सलग४५ डिग्री पेक्षा जास्त तापमान असल्यास उष्णतेची लाट समजली जाते. त्यामुळे अशा प्रकारची उष्णतेची लाट असल्यास नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

उष्णतेची लाट ही मुक आपत्ती आहे. एप्रिल, मे व जून महिन्यात तापमानात वाढ होऊन उष्माघताचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आतापासून काळजी घ्यावी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. 

उष्माघात होऊ नये यासाठी आतापासून जागरुक राहिले पाहिजे. रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्याकरीता जिल्ह्यात ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, शहरी आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर  प्रथमोपचार व उष्माघात नियंत्रणासाठी आवश्यक औषधी व साहित्य सामुग्री सुसज्ज ठेवण्यात आली असुन सर्व आरोग्य संस्थामध्ये शीतकक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर यांनी दिली.

उष्णतेचा त्रास कोणत्या लोकांना होऊ शकतो -

उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे, वृध्द व्यक्ती व लहान मुले, स्थुल व्यक्ती, अयोग्य कपडे घातलेले पुरेशी झोप नसलेले, गरोदर महिला, काही विशिष्ट औषधी घेत असलेले व्यक्ती, निराश्रित घरदार नसलेल्या गरीब अशा जोखीमेच्या लोकांना उष्णतेच्या लाटेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा नागरिकांनी काळजी घ्यावी.

उष्णताविकाराची प्रकार व लक्षणे -

- सनबर्न- त्वचा लालसर होणे, सुज येणे, वेदना, तीव्र स्वरुपाचा ताप व डोकेदुखी
- हिट क्रॅप्स- हातापायात गोळे येणे, पोटाच्या स्नायुत सुरडा येणे व खुप घाम जाणे,
- हिटएक्झाशन- खुप घाम येणे, थकवा येणे, त्वचा थंडगार होणे, नाडीचे ठोके मंद होणे, डोकेदुखी, चक्कर येणे, उलट्या होणे
- हिटस्ट्रोक- ताप १०६ (ड्रिगी फॅ) त्वचा गरम व कोरडी होणे, नाडीचे ठोके वेगात व जोरात होणे व घाम न येणे अर्धवट शुध्दीत असणे.

उष्माघात विकारापासून बचाव करण्याकरीता  पुरेसे पाणी प्यावे, लस्सी, ताक इत्यादीचा पिण्याकरिता उपयोग करावा. प्रवासात पाणी सोबत ठेवावे. हलक्या वजनाचे, पिक्कट रंगाचे सैलसर कपडे वापरावे, उन्हात  गॉगल, छत्री, पादत्राणे वापरावे, उन्हात जातांना टोपी हॅटखाली ओलसर कपडा ठेवावा. पाळीव प्राण्यांना सावलीत थंड ठिकाणी ठेवावे.रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्या, अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत घाम येत असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

उष्माघातापासुन बचाव करण्यासाठी शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. कष्टाची कामे उन्हात करु नये. पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेऊ नये. गडद रंगाचे फिट कपडे वापरु नये. उन्हाच्या  वेळेस स्वयंपाक करणे टाळावे, स्वंयपाक घर हवेशीर ठेवावे, मद्य,चहा कॉफी, सॉप्टड्रिंक्स आहारात घेऊ नये, खुप प्रथिनयुक्त अन्न शिळे अन्न खावू नये, बाहेरचे उघड्यावरचे व तळलेले पदार्थ खावू नये, असे आरोग्य विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos