महत्वाच्या बातम्या

 राज्यातील वृद्ध कलाकारांना सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारमुळे मोठा दिलासा


- पाच हजार रुपये मानधन देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्र हा विविध कला, संस्कृती आणि परंपरांनी नटलेला प्रदेश असून अनेक जुन्या पारंपारिक कला येथील सामाजिक जीवन समृद्ध करणाऱ्या आहेत; या कला सादर करणाऱ्या जुन्या वृद्ध कलावंतांचा सन्मान व्हावा तसेच त्यांच्या कुटुंबातील नव्या पिढीला हा वारसा पुढे नेण्यासाठी बळ मिळावे या दृष्टीने वृद्ध कलावंतांच्या मानधनामध्ये  वाढ करून ते सरसकट ५ हजार रुपये करण्याचा निर्णय आज घेण्यात आला असून राज्य मंत्रिमंडळाने या प्रस्तावास आज मंजुरी प्रदान केल्याबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले; यामध्ये राज्यातील वृद्ध कलाकारांना दिलासा देणारा हा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारमुळे घेण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन १९५४-५५ पासुन राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन ही योजना कार्यान्वित आहे. सदर योजनेतंर्गत सद्य:स्थितीत जिल्हानिहाय प्रतिवर्ष १०० असा इष्टांक असुन सन्मानार्थींना कलाकारांच्या अ, ब, क अश्या वर्गवारीनुसार मानधन दिले जात होते. 

मान्यवर जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधनात दीडपट वाढ करुन सुमारे ५ वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. सद्यस्थितीत मागील ५ वर्षांच्या कालावधीतील महागाईचा वाढता निर्देशांक पाहता तसेच, लोकप्रतिनिधी़, कलावंत तसेच विविध कलाकार संघटना यांचेकडून मान्यवर वृध्द साहित्यिक व कलाकार यांच्या मानधनात वाढ करण्याची  मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली होती.

साहित्यिक, कलाकार अशी सरसकट एकच श्रेणी सर्व कलाकारांना लागू केल्यास वृध्द कलाकारांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन जीवनमान उंचाविण्यास मदत होईल अशी भावना व्यक्त करून, त्यांच्या पुढील पिढीस एक आत्मविश्वास निर्माण होऊन लुप्त होत चाललेल्या राज्याच्या काही सांस्कृतिक कलाकृती यांचे जतन व संवर्धन करण्यास मदत होईल या हेतूने विद्यमान योजनेमध्ये कालानुरुप आवश्यक ते बदल करण्यास व प्रती लाभार्थी सरसकट रुपये ५ हजार प्रती माह इतके मानधन  करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यतिल ज्येष्ठ व वृद्ध कलाकारांनी या निर्णयाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos