निवडणूक लोकाभिमुख होण्यासाठी आयोगाचे टेक्नोसॅव्ही उपाय


-  विविध ॲप : पीडब्लयूडी, सीव्हीजील, सुविधाच्या माध्यमातून होणार समन्वय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी /  भंडारा  :
आगामी विधानसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग विविध डिजिटल ॲपचा वापर करीत आहे.  निवडणूक  लोकाभिमुख  होण्यासाठी  टेक्नोसॅव्ही  उपाय  अंमलात आणले जात आहे. पीडब्ल्यूडी, सीव्हीजील,  सुविधा आणि व्होटर हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातून  समन्वय साधला जाणार आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीपासून निवडणूक आयोग टेक्नोसॅव्ही झाला आहे.
 निवडणूकी दरम्यान आदर्श आचारसंहितेच काटेकोरपणे  पालन व्हावे, यासाठी सी-व्हिजील हे नवे ॲप  तयार करण्यात आले आहे. तर दिव्यांग  मतदाराच्या मदतीसाठी पीडीब्ल्यूडी ॲप तयार करण्यात आले. तसेच व्होटर हेल्पलाईन आणि सुविधा ॲपच्या माध्यमातून प्रशासन, उमेदवार आणि मतदारांमध्ये समन्वय ठेवण्यास मदत होणार आहे. निवडणूक प्रक्रिया अधिकाअधिक  लोकाभिमुख  होण्यासाठी आयोगाने लोकसभा निवडणूकीपासून प्रथमच टेक्नोसॅव्ही  उपाय अंमलात आणले आहेत. मतदारांना निवडणूकी बाबतच्या  तक्रारी आणि शंकाचे निरसनही या माध्यमातून होणार आहे.

   सी-व्हिजीलवर करता येते थेट तक्रार

  निवडणूकीच्या काळात आचारसंहितेचे उल्लंघन  झाल्याचे निदर्शनास आल्यास  सी-व्हीजील ॲपच्या माध्यमातून  थेट ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. सदर ॲप हे रिअल टाईमबेस आहे.  निवडणूक अधिसुचनेच्या तारखेपासून मतदानाच्या दुस-या दिवसापर्यंत या ॲपचा वापर करता येणार आहे. तक्रारीचे छायाचित्र, व्हिडीओ यात अपलोड करण्याची सुविधा आहे. या ॲपवर तक्रार  प्राप्त होताच शंभर मिनिटाच्या आत या तक्रारीचा निपटारा केला जाईल.

 याबाबत करता येतील तक्रारी

  मतदारांना पैसे, मद्य,अमली पदार्थ्यांचे वाटप करणे, शस्त्रसाठा, शस्त्रवापर, मतदारांना मारहाण, चिथावणीखोर भाषण, पेडन्यूज, मतदारांना  आमिष, मतदारांची मोफत वाहतूक, उमेदवारांची  मालमत्ता आदि प्रकारच्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी सीव्हीजील या ॲपवर करता येणार आहे.

दिव्यांगासाठी पीडब्ल्यूडी ॲप

  दिव्यांग मतदारांची नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हील चेअरची मागणी, मदतनीस, मतदान केंद्रावर जाण्यासाठी वाहन इत्यादी  सोयी उपलब्ध  करुन देण्यासाठी  पीडब्ल्यूडी हे ॲप उपलब्ध आहे.  हे ॲप दिव्यांग मतदारासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. 1950  या टोल फ्री क्रमाकांवर संबंधितांना माहिती उपलब्ध राहणार आहे.


उमेदवारांसाठी सुविधा ॲप

निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने सुविधा नावाने वेबपोर्टल व मोबाईल ॲप सुरु केले आहे. याव्दारे उमेदवारांनी  नामनिर्देशन पत्र भरणे, वाहन परवानगी , सभा, निवडणूका व  मतगणनेबाबत माहिती निवडणूक लढणा-या उमेदवारांना मिळणार आहे. निवडणूक आयोग तंत्रस्नेही झाल्यामुळे  नागरिकांना व मतदारांना इंटरनेटच्या माध्यमातून सर्व सुविधा एका क्लीकवर प्राप्त होणार आहे.

व्होटर हेल्पलाईन ॲप

 मतदानाच्या दिवशी अनेक मतदार मतदान यादीत नाव नसल्यामुळे मतदान करु शकत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी व्होटर हेल्पलाईन हे ॲप तयार केले आहे. या ॲपमध्ये मतदारांना त्यांचे नाव, आडनाव, केंद्र क्रमांक, भाग क्रमांक, विधानसभा क्षेत्र, जिल्हा, तालुका इत्यादी माहितीच्या आधारे नाव शोधता येणार आहे. त्याचबरोबर मतदार यादीत नाव टाकणे, नाव वगळणे, फार्म नं. 6, 7, 8, 8 अ हे ऑन लाईन भरता येऊ शकतात. यासोबतच मतदारांना 1950 या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन सुध्दा मतदार यादीतील नाव शोधता येऊ शकते. ॲपच्या माध्यमातून मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदवावा.  Print


News - Bhandara | Posted : 2019-09-25


Related Photos