महत्वाच्या बातम्या

 आंबेडकरी कार्यकर्त्यांनी स्वाभिमान सोडू नये : डॉ.सुरेश माने


- काॅंग्रेस - भाजपची निती सारखीच असल्याची केली टिका 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : काॅंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची निती काही वेगळी नाही. दोन्ही पक्ष आदिवासी, ओबीसी, बहुजन समाजाला तुकड्यांमध्ये वाटून हुकूमत गाजवायची आणि अनंत काळापासूनचा अन्याय अत्याचार याहीपुढे सुरूच ठेवायचे या भावनेने काम करतात. त्यामुळे आम्हाला आमचा सत्तेतील सन्मानजनक हक्क मिळवून घेणे आणि स्वाभिमान जोपासला पाहिजे असे प्रतिपादन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने यांनी केले.

येणाऱ्या निवडणुकीच्या प्राश्वभूमीवर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या वतीने आंबेडकरी कार्यकर्ता महामेळावा व निर्धार सभा इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

महामेळाव्याचे उदघाटन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री जराते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पक्षाचे विदर्भ अध्यक्ष विशेष फुटाणे, ज्येष्ठ विचारवंत लटारू मडावी, शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, कॉम्रेड अमोल मारकवार, युवा नेते विनोद मडावी, महासचिव इंजि. संजय मगर, महिला आघाडीच्या पूनम घोनमोडे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे प्रामुख्याने उपस्थित होते.

देशातील डावे, आंबेडकरवादी पक्ष संपविण्यासाठी भाजप - काॅंग्रेसने आजपर्यंत कटकारस्थाने केली आहेत. अशा स्थितीत आम्ही कोणासोबत जावे हाच मोठा प्रश्न आहे. असे असले तरी मोदी शहाच्या आणि संघाच्या मनुवादी व्यवस्थाला रोखण्यासाठी काही भूमिका ठरवून सर्वांनी एकत्र येवून भाजप विरोधात काम केले पाहिजे. मात्र याचा अर्थ बाबासाहेबांनी शिकविलेला स्वाभिमान आम्ही सोडणार आहोत,असे काॅंग्रेसने समजू नये असेही ॲड.सुरेश माने यांनी ठणकावून सांगितले. भाजप सरकारच्या सत्ताकाळात महिलांना शिक्षण, आरोग्य, रोजगार, महागाईच्या झळा सोसाव्या लागल्या असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये बहुजनवादी महिलांनी मोदी - शहाच्या विरोधात मते मिळवण्यासाठी काम करावे, असे आवाहन महामेळाव्याच्या उद्घाटक जयश्री जराते यांनी केले.

उपस्थित मान्यवरांनी सुद्धा एकतेचा नारा देत समाविचारी पक्ष सोबत लढण्याची गरज व्यक्त करुन भारतीय जनता पक्षाचे सरकार येणाऱ्या निवडणुकांमध्ये उलथवून लावण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रितेश अंबादे तर प्रास्ताविक जिल्हा प्रभारी राज बन्सोड यांनी केले आहे. यशस्वितेसाठी महासचिव पुरुषोत्तम रामटेके, उपाध्यक्ष अरविंद कांबळे, शहराध्यक्ष प्रतीक डांगे, गोकुळ ढवळे, सचिन गेडाम, मुन रायपुरे, देवा वनकर, सविता बांबोळे, विद्या कांबळे, प्रतिमा करमे, नीलम दुधे, ईशा दुर्गे, करुणा खोब्रागडे, विभा उमरे, शोभा खोब्रागडे, आवळती वाळके, विद्यार्थी मोर्चाचे कमलेश रामटेके, राजेश्वरी कोटा, सतीश दुर्गमवार, अक्षय कोसनकर, आकाश आत्राम, सुरज ठाकरे, देवेंद्र भोयर, थामस शेडमेक, किशोर नरुले, जितू बांबोळे, पियुष वाकडे यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos