महत्वाच्या बातम्या

 निलजई व उकणी येथील शेतजमीनीची नुकसान भरपाई संबंधीत शेतकऱ्यांना त्‍वरित द्यावी


- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

- त्‍वरित योग्‍य कार्यवाही करण्‍याचे वेकोलीचे सीएमडी मनोज कुमार यांचे आश्‍वासन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : निलजई व उकणी येथील शेतजमीनींच्‍या झालेल्‍या नुकसानाची भरपाई त्‍वरित संबंधीत शेतकऱ्यांना देण्‍यात यावी. तसेच शेतातील पावसाचे पाणी काढण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक ड्रेन त्‍वरित तयार करण्‍यात यावी. येत्‍या दीड महिन्‍यात शेतातील पाणी काढण्‍यात आले नाही तर वेकोलीने संबंधीत शेतजमिनी संपादीत कराव्‍या, असे निर्देश चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री तथा राज्‍याचे वने व सांस्‍कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

वनभवन, नागपूर येथे वनमंत्री मुनगंटीवार यांनी वरिल विषयाच्‍या अनुषंगाने वेस्‍टर्न कोलफिल्‍डस लिमिटेडचे सीएमडी मनोज कुमार, कार्मिक संचालक संजय कुमार, मुख्‍य महाप्रबंधक आभास सिंह यांच्‍यासह बैठक घेतली.

निलजई व उकणी या गावांमध्‍ये वेकोलीच्‍या चुकीच्‍या नियोजनामुळे २०१९ पासून पावसाचे पाणी शेतीजमीनीमध्‍ये जमा होवून शेताचे स्‍वरुप तलावाप्रमाणे झाल्‍याची तक्रार शेतक-यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे केली. या तक्रारीच्‍या अनुषंगाने मुनगंटीवार यांनी वेकोलीच्‍या उच्‍चाधिकाऱ्यांसह बैठक घेवून चर्चा केली. २०१९ पासून शेत पाण्‍याखाली येत असल्‍यामुळे झालेल्‍या नुकसानाची भरपाई वेकोलीने द्यावी, शेतजमीन वेकोलीने अधिग्रहीत करावी, आदी मागण्‍या शेतक-यांनी या बैठकीत केल्‍या. या संदर्भात मंत्री मुनगंटीवार यांनी बैठकीत वेकोली प्रशासनाला योग्‍य कार्यवाहीचे निर्देश दिले. या संदर्भात त्‍वरित मागण्‍या तपासून योग्‍य कार्यवाही करण्‍यात येईल, असे आश्‍वासन वेकोलीचे सीएमडी मनोज कुमार यांनी दिले. या बैठकीत विवेक बोढे, अमोल थेरे, धनराज पारखी, सुरेंद्र भोंगळे, बबलु सातपुते यांच्‍यासह संबंधीत शेतकऱ्यांची उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos