जिल्हा सामान्य रुग्णालयात आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा


- ज्येष्ठांनी निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करावा; मान्यवरांचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (NCD) आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याची काळजी, सकस आहार, तणावमुक्त जीवनशैली आणि निरोगी वृद्धत्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीप गजभिये यांच्या हस्ते झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुजाता दुधगावकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अतुल टेंभुर्णे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात जिल्हा समन्वयक डॉ. शैलेश कुकडे यांनी ज्येष्ठ नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करणे, सकस व संतुलित आहार घेणे आणि तणावमुक्त जीवन जगणे यांचे महत्त्व विशद केले. तसेच वाढत्या वयानुसार आरोग्याची योग्य काळजी घेऊन जीवनशैलीत आवश्यक बदल करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना अधिष्ठाता डॉ. सुजाता दुधगावकर यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आनंदी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे महत्त्व सांगितले. ज्येष्ठांचे आरोग्य जपण्यासाठी नियमित तपासणी, योग्य आहार आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे संचालन आहारतज्ज्ञ वनिता चकोले यांनी केले, तर कामिनी गेडाम यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एनसीडी विभागातील डॉ. सुचिता काकडे यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.




Petrol Price




