महत्वाच्या बातम्या

 एचडीएफसी बँकेचा ग्राहकांना पुन्हा झटका : होम लोन, कार लोन व पर्सनल लोन महागले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने (HDFC) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या एमएलसीआरमध्ये (MCLR) वाढ केली आहे.

एमएलसीआर मधील वाढीचा थेट परिणाम तुमच्या होम लोन, कार लोन, पर्सनल लोन इत्यादींच्या ईएमआयवर वर होतो. म्हणजेच तुमच्या कर्जाचा ईएमआय वाढेल. नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना कर्जासाठी पूर्वीपेक्षा जास्त व्याजदर द्यावे लागतील. हे नवे दर आज म्हणजेच ८ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, आता काही कालावधीसाठी एमएलसीआर ०.१० टक्क्यांनी वाढवण्यात आलाय.

एचडीएफसीचे नवे एमएलसीआर दर -

एचडीएफसी बँकेचा ओव्हरनाईट एमएलसीआर १० बेसिस पॉईंट्सने वाढला असून तो ८.८० टक्क्यांवरून ८.९० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
एका महिन्याचा एमएलसीआर ५ बीपीएसनं वाढून ८.८५ टक्क्यांवरून ८.९० टक्के करण्यात आला.
तीन महिन्यांचा एमएलसीआर वाढवण्यात आला असून तो ९.१० टक्के करण्यात आला.
सहा महिन्यांचा एमएलसीआर आता ९.३० टक्के आला.
एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एमएलसीआर ९.३० टक्के झाला आहे. त्यात ०.०५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. पूर्वी तो ९.२५ टक्के होता.
२ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एमएलसीआर ९.३५ टक्के करण्यात आला.
३ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एमएलसीआर ९.३५ टक्के आहे.

कसा ठरवला जातो एमएलसीआर?

एमएलसीआर ठरवताना त्यात अनेक गोष्टी लक्षात घेतल्या जातात. यामध्ये डिपॉझिट रेट, रेपो रेट, ऑपरेशनल कॉस्ट आणि कॅश रिझर्व्ह रेशो राखण्यासाठी लागणारा खर्च यांचा समावेश असतो. रेपो दरातील बदलांचा एमएलसीआर दरावर परिणाम होतो. एमएलसीआर मधील बदल कर्जाच्या व्याजदरावर परिणाम करतात, ज्यामुळे कर्जदारांची ईएमआय वाढतो.

काय होतो परिणाम?

एमएलसीआर मधील वाढीचा परिणाम होम लोन, कार लोन, पर्सनल लोनसह सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरांवर दिसून येतो. दरम्यान, ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना महागड्या दरात कर्ज मिळेल.





  Print






News - World




Related Photos