जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल इंग्लडमधील कॅटरबरी चर्चच्या आर्चबिशप जस्टीन वेल्बी यांनी मागितली माफी


वृत्तसंस्था / अमृतसर :  स्वातंत्र्याच्या मागणीसाठी जालियनवाला बागेत सभेसाठी आलेल्या भारतीयांवर ब्रिटिश सैन्याने कर्नल रेजिनाल्ड एडवर्ड डायर यांच्या आदेशावरून नरसंहार केला होता. या घटनेबद्दल भारताच्या दौऱ्यावर असलेल्या  इंग्लडमधील कॅटरबरी चर्चच्या आर्चबिशप जस्टीन वेल्बी यांनी माफी मागितली. आर्चबिशप वेल्बी यांनी जालियनवाला बागेतील स्मृती स्तंभासमोर नतमस्तक होत माफी मागितली. “इथे घडलेल्या गुन्ह्याची लाज वाटते, त्यासाठी मी माफी मागतो”, असे वेल्बी यावेळी म्हणाले.
१३ एप्रिल १९१९मध्ये बैसाखी सणाच्या दिवशी अमृतसरमधील जालियनवाला बागेत स्वातंत्र्याच्या मागणीसाठी सभा बोलवण्यात आली होती. यावेळी जमलेल्या भारतीयांवर ब्रिटिश सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक झाले होते.
भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लडमधील कॅटरबरी चर्चचे आर्चबिशप रेव्हरंड जस्टीन वेल्बी यांनी जालियनवाला बागेला मंगळवारी भेट दिली. स्मृती स्तंभासमोर नतमस्तक होत वेल्बी यांनी शहिदांना अभिवादन केले. यावेळी बोलताना वेल्बी म्हणाले, “मी ब्रिटिश सरकारला बोलू शकत नाही, पण येशू ख्रिस्ताच्या नावाने बोलू शकतो. हे पापमुक्त करण्याचे ठिकाण आहे. तुम्हाला माहित आहे, त्यांनी इथे काय केले होते आणि त्यांच्या स्मृती कायम जिवंत राहतील. इथे घडलेल्या गुन्ह्याच्या परिणामांसाठी एक धार्मिक नेता म्हणून मी या लज्जास्पद घटनेवर माफी मागतो”, असे जस्टीन वेल्बी म्हणाले.
जालियनवाला बागेला भेट दिल्यानंतर अभ्यागतांच्या नोंदवहीत त्यांनी अभिप्राय नोंदवला. “शेकडो वर्षापूर्वी झालेल्या नरसंहाराची साक्ष देणाऱ्या या ठिकाणाला भेट देताना भावना भडकतात आणि लाज वाटते. मृतांच्या वारसांसाठी मी प्रार्थना करतो. इतिहासातून धडा घेऊन द्वेषाचे मूळ फेकून देऊन चांगल्या गोष्टींनी उभारी घ्यावी, अशी प्रार्थना करू”, असे वेल्बी म्हटले आहे.  Print


News - World | Posted : 2019-09-11


Related Photos