दुचाकीसह नदीत वाहून गेलेल्या वढोली येथील तुळशिदास चुधरी याचे प्रेत सापडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंडपिपरी :
गोंडपिपरी - मुल मार्गावरील वढोली जवळील अंधारी नदीत दुचाकीसह वाहून गेलेल्या युवकाचे प्रेत दोन दिवसानंतर आज १२ ऑगस्ट रोजी सापडले आहे.
तुळशिदास सुरेश चुधरी (३५) असे विवाहीत युवकाचे नाव आहे. तुळशिदास हा नांदगाव येथे कामासाठी गेला होता. शनिवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास तो वढोलीकडे दुचाकीने येत होता. दरम्यान अंधारी नदीच्या पुलावरून जात असताना विरूध्द दिशेने एक टिप्पर आला. टिप्परला रस्ता देत असतानाच त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि थेट दुचाकीसह तो नदीत कोसळला. नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. शनिवारपासून तुळशिदास चा शोध सुरू होता. अखेर आज १२ ऑगस्ट रोजी सकाळी त्याचे प्रेत पुलापासून २ ते ३ किमी अंतरावर तरंगतांना आढळून आले. तुळशिदास याच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याचे कुटुंबीय तसेच वढोली वासीयांवर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई - वडील, पत्नी एक ३ वर्षांची मुलगी आहे. घटनेचा तपास गोंडपिपरी पोलिस करीत आहेत.
गोंडपिपरी - मुल हा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. या मार्गावर वढोली आणि बामणी गावाच्या मध्ये अंधारी नदी वाहते. या नदीवरील पुलाच्या निर्मितीला अनेक वर्ष झाली आहेत. हा पुल ठेंगणा असण्यासोबतच अरूंदसुध्दा आहे. पुलाला कठडेही नाहीत. यामुळे याआधीसुध्दा अनेक अपघात घडले आहे. या मार्गावर दुसऱ्या पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी केली जात आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-12


Related Photos