२०२७च्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमसाठी दिल्लीत ८ ऑक्टोबरला निर्णायक बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत सरकारच्या राजपत्रातील प्रश्नावलीत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश नसल्याच्या पार्श्वभूमीवर २०२७च्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या नियोजनाला अंतिम स्वरूप देण्यासाठी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब, रफी मार्ग येथे दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या आंदोलनाच्या नियोजनासाठी यापूर्वी बेंगळुरू (कर्नाटक), नागपूर (महाराष्ट्र), हैदराबाद (तेलंगणा) आणि छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथे बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता दिल्लीतील बैठकीत हिवाळी अधिवेशनादरम्यान करण्यात येणाऱ्या आंदोलनाची दिशा, स्वरूप आणि पुढील नियोजनावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
२०२७च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद होण्यासाठी सध्या असलेल्या खुल्या स्वरूपाच्या प्रश्नांऐवजी ड्राफ्टेड डाउन सूची तयार करून स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. यासोबतच केंद्र सरकारमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, १३ सप्टेंबर २०१७ पासून क्रिमी लेयरची उत्पन्नमर्यादा वाढविण्यात आलेली नसल्याने ती तातडीने वाढवावी, तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशा विविध मागण्यांवरही दिल्लीतील आंदोलनात आवाज उठविण्यात येणार आहे.
कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे होणाऱ्या या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, बीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जाजुला श्रीनिवास गौड, राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य तथा ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष इक्बाल अन्सारी यांच्यासह खासदार, आमदार आणि विविध ओबीसी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बीसी वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी, ओबीसी संघटनांचे अध्यक्ष तसेच विविध जात संघटनांचे पदाधिकारी या महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिली आहे. २०२७च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद होण्याच्या मागणीला देशव्यापी स्वरूप देण्यासाठी या बैठकीकडे ओबीसी समाजाचे लक्ष लागले आहे.




Petrol Price




