महत्वाच्या बातम्या

 कोठारी पोलिसांचा कुख्यात दारू विक्रेत्याला तडीपारीचा दणका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : कोठारी पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळताच ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार यांनी आगामी मस्कऱ्या गणपती तसेच दुर्गा व शारदा नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कारवाईला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुख्यात दारू विक्रेता मनोज देवराव चांदेकर ४५ वर्ष रा. परसोडी, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, त्याला एक महिन्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

मनोज चांदेकर याच्याविरुद्ध अवैध दारू विक्रीसंदर्भात एकूण सहा गुन्हे दाखल असल्याची नोंद पोलिसांकडे आहे. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. यापूर्वी त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्याच्या कथित अवैध कारवाया सुरूच असल्याने पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला.

कोठारी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये गोपनीय प्रस्ताव तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला. या प्रस्तावाची दखल घेत उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी यांनी चांदेकर याला एक महिन्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी त्याची हद्दपारी केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र इंगळे, पोलीस अंमलदार हिवाराज सातपुते, गणेश देठे तसेच चंद्रपूर गुन्हे शाखेचे सहायक फौजदार अरुण खारकर आणि परवेज शेख यांनी मोलाची भूमिका बजावली.





  Print






Related Photos