महत्वाच्या बातम्या

 खाद्यपदार्थाच्या स्टॉलधारकांनी दर्शनी भागात परवाना लावावा : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


- शहरातील चौकाचौकातील अतिक्रमण हटविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

- ग्राहक सरंक्षणच्या सदस्यांच्या मागणीला तत्पर प्रतिसाद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : शहरातील रस्त्यावरील टपऱ्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून महानगरपालिकेने सर्व चौकात असलेले  अ‍तिक्रमण तत्काळ दूर करण्यासाठी मोहिम राबवावी. दिवाळी जवळ येत असून सणासुदीचे दिवस आहेत. अशावेळी नागरिकांना वाहतूक करतांना त्रास होऊ नये. अनेक टपऱ्यातून आरोग्याला घातक असे अन्न पदार्थ दिल्या जाते. अन्नपदार्थातील भेसळीची योग्य तपासणी करा. तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधितांना दिल्या. प्रत्येक खाद्यपदार्थ स्टॉल धारकांनी दर्शनी भागात परवाना लावणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, तहसिलदार चैताली सावंत, समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य यावेळी उपस्थित होते.  

नोंदणीकृत स्टॉलधारकांनाच खाद्यविक्रीची परवानगी देण्यात यावी. अन्यथा त्यांना दंडीत करुन कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. शिवभोजन थाळी योग्य पोषण आहार मिळेल याची खात्री करुन पात्र नागरिकांनाच शिवभोजन थाळी देण्यात यावी, असेही ते म्हणाले. वाहतूक विभाग, महापालिका व अन्न व औषधी प्रशासनाने एक महिन्यात कारवाई करुन त्याबाबतच अहवाल सादर करावा. समितीत असलेले व ज्यांच्या विभागाशी संबंधित समस्या असलेल्या विभागाने नियमित बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

विजेच्या झटक्याने जनावरांचा मृत्यु झाल्यास शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विम्याच्या रक्कमेतून शेतकऱ्यांच्या कर्जाची वसूल करण्यात येत असल्याची समिती सदस्यांनी  निदर्शनास आणून दिली असता याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करुन त्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीनी शेतकऱ्यांशी सहानुभूतीपूर्वक व्यवहार ठेवून सौजन्याने वागावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

अन्न व औषध प्रशासनाने आतापर्यंत ३६ स्टॉलधारकांवर कारवाई केली असून दंड स्वरुपात त्यांचेकडून ८३ हजार रुपये वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. घरगुती स्मार्ट मिटर तसेच राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या आयोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.





  Print






News - Nagpur




Related Photos