कचरामुक्त गावासाठी सरसावले शेकडो हात


- एकाच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध सार्वजनिक स्थळांची स्वच्छता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार,१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील गावागावात महाश्रमदान मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, युवक, महिला आणि विविध सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी जिल्ह्यातील नागरिकांना ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या गावातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेकडो नागरिक स्वच्छतेसाठी पुढे आले. हातात झाडू आणि स्वच्छता साहित्य घेत नागरिकांनी सार्वजनिक परिसर, रस्ते, शाळा परिसर, ग्रामपंचायत परिसर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी श्रमदान केले.
महाश्रमदान मोहिमेत गावकऱ्यांसोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रत्यक्ष सहभागी होत स्वच्छतेचा संदेश दिला. गावातील सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे एकाच दिवशी जिल्ह्यातील विविध गावांमधील अनेक सार्वजनिक स्थळांना स्वच्छ आणि सुंदर स्वरूप प्राप्त झाले.
स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम न राहता ती गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनावी, यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. महाश्रमदानाच्या माध्यमातून सामूहिक सहभाग, श्रमदान आणि स्वच्छतेची जबाबदारी यांचा प्रभावी संदेश गावागावात पोहोचला.
स्वच्छता ही सेवा अभियानातील सर्व उपक्रम यशस्वी करा : चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांच्या सहकार्याने महाश्रमदान मोहीम मोठ्या उत्साहात राबविता आली. गावागावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी दाखविलेला सहभाग कौतुकास्पद आहे. स्वच्छता ही सेवा अभियानातील सर्व उपक्रम प्रत्येक गावात प्रभावीपणे राबवून स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त गाव निर्मितीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले.




Petrol Price




