लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी मित्रपक्षांनी काँग्रेसला धोका दिला : मल्लिकार्जुन खरगे


वृत्तसंस्था / मुंबई :  लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी मित्रपक्षांनी काँग्रेसला धोका दिल्याचे स्पष्ट झाले असल्याचा दावा काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी केला. तरीसुद्धा विधानसभेला राष्ट्रवादी व इतर पक्षांबरोबरची महाआघाडी अभंग राहील, असेही त्यांनी नमूद केले. 
मुंबई व कोकणातील लोकसभा निवडणुकांतील काँग्रेसच्या यशापयशाचा आढावा टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेसकडून घेण्यात आला. यावेळी खरगे म्हणाले की, 'आम्ही आज पाच सचिवांची समिती बनवली आहे. ती राज्याच्या ३६ जिल्ह्यांचा याच महिन्यात दौरा करेल आणि आपला अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करेल. जिल्हा सेक्रेटरी, जिल्हाध्यक्ष, ब्लॉकप्रमुख यांनी लोकसभा निवडणुकीत योग्य काम केले नसेल, ज्यांच्याविषयी कार्यकर्ते-उमेदवारांच्या तक्रारी आहेत, अशांची पदावरून तत्काळ हकालपट्टी करण्यात येईल.' 
'गेला आठवडाभर आम्ही बैठका घेत आहोत. प्रदेशाध्यक्ष बदलाचा कोणताही प्रस्ताव चर्चेला आला नाही. आम्ही काँग्रेसचे संघटन कुठे कमकुवत आहे, कुठे मजबूत आहे, ती ठिकाणे निश्चित केली आहेत. तसेच मित्रपक्षांना कोणत्या जागा सोडायच्या याचासुद्धा कच्चा आराखडा बनवण्यात आला आहे', अशी माहिती खरगे यांनी यावेळी दिली. दरम्यान, आजच्या बैठकीत नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेला ऐरोली मतदारसंघ पक्षाकडे घेण्याची मागणी केली. तेथून संदीप नाईक हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. 
आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीसाठी आंबेडकर-ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीशी काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व अजिबात चर्चा करणार नाही. या आघाडीला महाआघाडीत घ्यायचे की नाही, त्यांना किती जागा द्यायच्या, या संदर्भातला निर्णय सर्वस्वी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनीच घ्यायचा आहे, असे खरगे यांनी स्पष्ट केले. 

   Print


News - Rajy | Posted : 2019-06-15


Related Photos