तोंडी परीक्षेचे गुण कमी केल्याने यंदाच्या निकालावर परिणाम : शिक्षणमंत्री विनोद तावडे


वृत्तसंस्था / मुंबई :  दहावीच्या निकालाची टक्केवारी यंदाही घसरल्याने सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘तोंडी परीक्षेचे गुण कमी केल्याने त्याचा यंदाच्या निकालावर परिणाम झाला असून त्यामुळेच दहावीच्या एकूण टक्केवारीत घसरण झाली आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.’
तावडे म्हणाले, आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालानुसार, गतवर्षीच्या तुलनेत एकूण टक्केवारीत १२ टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे काही पालकांकडून प्रवेशाबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. तर काही शिक्षणतज्ज्ञांकडून याचे स्वागत केले जात आहे. तोंडी परीक्षेचे २० गुण शाळांनी देण्याची पद्धत २००७ पर्यंत नव्हती त्यावेळी सरासरी ७० टक्के इतका दहावीचा निकाल लागायचा. मात्र, २००८ ते २०१८ या काळात तोंडी परीक्षा घेतली जात असल्याने निकालाच्या टक्केवारीत फरक पडून ती एकदम १६ टक्के वाढली. त्यामुळे परीक्षेचा एकूण निकाल ८६ टक्क्यांपर्यंत पोहोचला.
गेल्या दहा वर्षात ज्या तोंडी परीक्षेच्या गुणांमुळे ही टक्केवारी वाढली होती. त्या तोंडी परीक्षेचे गुण कमी केल्यानेच यंदा दहावीच्या एकूण टक्केवारीत घसरण झाली आहे. त्यामुळे खरंतर विद्यार्थ्यांना त्यांचे खरे गुण समजले आहेत. त्यामुळे त्यांना आता त्यांची पुढची दिशा ठरवता येईल. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत. त्यांना महिनाभरात पुन्हा अभ्यास करुन फेरपरीक्षा देता येईल. अन्यथा त्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल, त्यामुळे कमी गुण मिळाल्याने निराश न होण्याचा सल्लाही यावेळी तावडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.  Print


News - Rajy | Posted : 2019-06-08


Related Photos