अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान पोषण माह व सेवा संकल्प अभियान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, हिंगणघाट (ग्रामीण) यांच्या वतीने पोषण माह व सेवा संकल्प अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तुळसकर कॉलेज येथील सभागृहात आयोजित या कार्यक्रमात २५ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगणघाट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविंद्र पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी बस्सी, बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल चिरुटकर आदी उपस्थित होते.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या बालक, माता आणि कुटुंबांच्या पोषण व सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असतात. त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेला मानाचा मुजरा म्हणून या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सेविका व मदतनीसांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे MasterChef अंगणवाडी सेविका या अभिनव स्पर्धेचे आयोजन. पोषणमूल्य, स्थानिक व उपलब्ध अन्नपदार्थांचा कल्पक वापर, चव तसेच आकर्षक सादरीकरण या माध्यमातून पोषणयुक्त आहाराची संकल्पना प्रभावीपणे मांडण्यात आली. सेविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या पाक कौशल्याचे आणि पोषणविषयक ज्ञानाचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रंजना जवादे यांनी केले. कार्यक्रमाला हिंगणघाट ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.




Petrol Price




