दुचाकीस्वाराला वाचविताना एसटी बस थेट शेतात : चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस अनियंत्रित होऊन थेट शेतात शिरल्याची घटना सोमवारी सकाळी जयरामपूरजवळ घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात ठेवल्याने मोठी दुर्घटना टळली असून बसमधील प्रवाशांचा थोडक्यात जीव वाचला.गोंडपिपरी येथून सोमवारी सकाळी सुमारे ७ वाजता गणपूर रे–लखमापूर–बोरी–भेंडाळा मार्गावर ही एसटी बस रवाना झाली होती. जयरामपूरजवळ बस पोहोचली असता अचानक दुचाकीस्वार समोर आल्याने त्याला वाचविण्यासाठी चालकाने बस वळविली.
या प्रयत्नात बस रस्त्याच्या कडेला जाऊन अनियंत्रित झाली आणि थेट शेतात शिरून अडकली. बस शेतात शिरताच प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र चालकाने वेळीच नियंत्रण मिळविल्याने बस उलटली नाही किंवा मोठी दुर्घटना घडली नाही. त्यामुळे बसमधील प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेत बसचे नुकसान झाल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच बस बाहेर काढण्यासाठी बुलडोझर आणि क्रेनची मदत घेण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर बसला शेतातून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी चालकाने घेतलेला तत्काळ निर्णय आणि दाखविलेले प्रसंगावधान यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. या घटनेमुळे संबंधित मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




Petrol Price




