महत्वाच्या बातम्या

 विशेष मिशन इंद्रधनुष्य ०.५ जिल्हास्तरीय मोहिमेस प्रारंभ


- लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये-जि.प. उपाध्यक्ष

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथी अंतर्गत उपकेंद्र गोधनी (रेल्वे) येथे आज विशेष मिशन इंद्रधनुष्य ०.५ या जिल्हास्तरीय मोहिमेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती तथा बांधकाम सभापती कुंदा राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला पंचायत समिती नागपुरच्या सभापती रुपालीताई मनोहर, पं.स. सदस्य अपर्णा राऊत, गोधनी (रेल्वे) ग्रामपंचायतीचे सरपंच, दिलीप राऊत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रेवती साबळे, कामठी तालुका आरोग्य अधिकारी तालुका डॉ. संजय चिलकर, उपस्थीत होते.

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शुन्य ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक व माता लसीकरणापासून वंचित राहू नये. या उद्देशपूर्तीसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करावे, असे आवाहन कुंदा राऊत यांनी केले. प्रस्ताविकात माहिती देताना जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रेवती साबळे यांनी बालकांमधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी माध्यम आहे असे सांगितले. अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेल्या बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पडतात. बालमृत्यू व मातामृत्यू कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे नागपूर जिल्ह्यात - विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम ०.५  हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मोहीमेत लसीकरणापासून वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचे व गरोदर मातांचे लसीकरण करण्यात येणार आहे. विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम ०.५ ही मोहीम तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येईल. पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्ट, दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर व तिसरी फेरी ९ ते १४ ऑक्टोंबर अशी आहे.

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शुन्य ते एक वर्ष वयोगटातील ४ हजार ६२६ बालके, १ ते २ वर्षे वयोगटातील ४ हजार ४१८ बालके व २ ते ५ वयोगटातील २३९ बालकांचे लसीकरण करण्यात येईल. त्याचबरोबर ८७९  गरोदर मातांना सुध्दा लस देण्यात येणार आहे. यासाठी एकूण 554 विशेष लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आलेले आहे.

विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम ०.५ राबवून सुटलेले लसीकरण पूर्ण करून बालकांचे आरोग्य व आयुष्य सुरक्षित करूया. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी या प्रसंगी कर्मचाऱ्याना सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. आ. केंद्र गुमथीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक सुरेश शिगोड, सुधा किडावु, डॉ. पूजा, देशमुख व सोमकुवर, राखाडे व आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Nagpur




Related Photos