हिवतापाबाबत अतिसंवेदनशील १ हजार ३१५ गावात डास प्रतिबंधक फवारणी, ७२ हजार मच्छरदाण्या वितरित करणार


- जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक  यांची माहिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली
: जिल्ह्यात हिवतापाचे रूग्ण वाढू नयेत, यासाठी हिवताप विभागातर्फे येत्या पावसाळ्यात विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. मलेरिया नियंत्रणासाठी जिल्ह्याच्या हिवतापाबाबत अतिसंवेदनशील १ हजार ३१५ गावात डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येणार आहे. तसेच   ७२ हजार मच्छरदाण्या वितरित करण्यात येणार आहे. मागील   सात-आठ वर्षात हिवताप आणण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे  जिल्ह्यातील हिवताप रोग नियंत्रणात आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी  पत्रकार परिषदेत दिली. यावेळी  प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संजय समर्थ उपस्थित होते.
पुढे माहिती देताना डॉ. मोडक म्हणाले, सन २०१७-१८ ते मार्च २०१९ या सव्वादोन वर्षाच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाने बाधित नऊ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २०१७ वर्षात पाच, २०१८ मध्ये तीन व २०१९ च्या जानेवारी महिन्यात एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. २०१७ मध्ये एकूण ५ लाख ९८ हजार १६० लोकांचे रक्त नमुने घेण्यात आले. यापैकी ५ हजार ४८४ रूग्ण हिवताप बाधित आढळून आले. यामध्ये पीव्ही स्वरूपाचे ९३४ व पीएफ स्वरूपाच्या ४ हजार ४५० रूग्णांचा समावेश आहे. २०१८ मध्ये ५ लाख ५९ हजार २९६ लोकांचे रक्त नमुने घेण्यात आले. यापैकी २ हजार ५८४ हिवताप बाधित रूग्ण आढळून आले. चालू वर्षात २०१९ मध्ये मार्चपर्यंत १ लाख १२ हजार ४९१ लोकांचे रक्तनमुने घेण्यात आले. यापैकी २१० रूग्ण हिवताप बाधित आढळून आले.
जिल्ह्यात आरोग्य सेवकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. यामुळे मागील वर्षी पावसाळ्यात ६६ कंत्राटी आरोग्य सेवकांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्यामार्फत हिवताप नियंत्रणाचे कार्य करण्यात आले. यावर्षी  हिवतापाबाबत संवेदनशील असलेल्या जिल्ह्यातील १ हजार ३१५ गावांमध्ये जून महिन्यापासून मलेरिया प्रतिबंधात्मक फवारणी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी फवारणी कामगारांच्या ४० चमू कार्यरत राहणार आहे. यामध्ये प्रत्येक चमूत सहा कर्मचाऱ्यांचा समावेश राहिल. याशिवाय रक्त नमुने तपासणाऱ्या तंत्रज्ञाचे रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. कुणाल मोडक यांनी  दिली. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांना मच्छरदाण्यांचा पुरवठा करण्यात आला. 
 जंगलालगतच्या गाव परिसरात हिवतापाचे डास आढळून येतात. गडचिरोलीसह काही शहरी भागातील डासांची चाचणी केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे, असे डॉ. मोडक यांनी सांगितले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-24


Related Photos