महत्वाच्या बातम्या

 ३ ऑगस्टर्पंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थिती पासून पिकांना संरक्षण मिळावे, या करीता केंद्र शासनातर्फे खरीप २०१६ पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनातर्फे यावर्षी एक रुपया प्रति अर्ज या नाममात्र दराने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नोंदणीची अंतिम मुदत ३१ जुलै, २०२३ पर्यंत होती. परंतु, जास्तीत जास्त शेतकरी यात सहभागी व्हावे, यासाठी नोंदणीकरीता ३ दिवसांची मुदतवाढ मिळाली असून नोंदणीची अंतिम मुदत ०३ ऑगस्ट २०२३ आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात खरीप २०२३-२४ या हंगामाकरीता भात (तांदुळ), कापूस, सोयाबीन, तुर, ज्वारी, मुग व उडीद या अधिसुचित पिकांचा विमा संरक्षित रक्कमेनुसार समावेश करण्यात आलेला असून शेतकऱ्यांना टाळता न येण्याजोग्या कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीच्या जोखिम बाबींचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ६६७ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदविलेला असून मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पटीने वाढली आहे. पीक विमा योजनेतील नोंदणीबाबत नागपूर विभागाच्या स्तरावर चंद्रपूर जिल्हा अव्वल क्रमांकावर आहे.

जिल्ह्यातील पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या जरी वाढलेली असली तरी या योजनेत नोंदणीची अंतीम मुदत ०३ ऑगस्ट, २०२३ रोजी संपूष्ठात येत असल्याने जिल्ह्यातील उर्वरीत सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपले पिकांस विमाकवच प्राप्त करून घ्यावे. अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा.

तसेच अतिवृष्टी, सततचा पाऊस, पूर परिस्थिती ई. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमूळे विमा सरंक्षित पिकांचे नुकसान झाले असल्यास त्याबाबत ओरिएंटल इन्सुरन्स कंपनी लि. च्या टोल फ्री क्रमांक १८०० ११ ८४८५ वर किंवा पीक विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधींना संपर्क साधून पूर्वसुचना देण्याबाबतचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos