ब्रम्हपुरीत दारूच्या ग्राहकावरून तरुणाला घराबाहेर ओढून मारहाण : चाकूने जीवे मारण्याची धमकी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रम्हपुरी येथील सुंदरनगर परिसरात दारूच्या ग्राहकावरून झालेल्या वादातून १८ वर्षीय तरुणाला तिघांनी घरातून बाहेर ओढून आणत मारहाण केल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी रात्री घडली. यावेळी तरुणाला चाकूने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ईशांत मोघल डांगे १८ वर्ष रा. सुंदरनगर, ब्रम्हपुरी हे रात्री सुमारे ११ वाजता आपल्या घरी जेवण करीत होते. त्यावेळी त्यांच्या वार्डातील दादू प्रकाश घरडे, काशिम शेख आणि सौरभ आनंद हे तिघे त्यांच्या घरी आले.
तिघांनी ईशांत यांना गडचिरोली जिल्ह्यातील ग्राहकांना दारूचा माल का पुरवित आहे, असा जाब विचारला. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यानंतर तिघांनी ईशांत यांना घराबाहेर ओढत सार्वजनिक रस्त्यावर आणले. यावेळी दादू प्रकाश घरडे याने ईशांत यांच्या दोन्ही गालावर थपडा मारल्या. तसेच शिवीगाळ करून जिथे भेटशील तिथे चाकूने मारून टाकीन, अशी धमकी दिली.
घटनेदरम्यान वार्डातील नागरिक घटनास्थळी आले. त्यांनी हस्तक्षेप करून ईशांत यांची तिघांच्या तावडीतून सुटका केली. घटनेनंतर प्रकृती बरी नसल्याने आणि भीती वाटत असल्याने ईशांत हे तत्काळ पोलिस ठाण्यात जाऊ शकले नाहीत. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी त्यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली.
या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलिसांनी दादू प्रकाश घरडे, काशिम शेख आणि सौरभ आनंद यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ११५(२), ३३३, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.




Petrol Price




