कुणबी समाजाच्या महामोर्चाला भाजपाचा पाठींबा : खा. अशोक नेते


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कुणबी समाज संघटनेच्या वतीने उद्या २७ डिसेंबर रोजी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील मोठ्या संख्येने असलेला कुणबी व ओबीसी समाज अन्याय सहन करीत आहे. या विरूध्द कुणबी समाज बांधवांनी आयोजित केलेल्या महामोर्चाला भारतीय जनता पक्षाचा पाठींबा आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते यांनी दिली आहे.
मागील शासनाने केवळ मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून ओबीसी समाज बांधवांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले होते. आपली सत्ता येताच मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न चालविले. अखेर मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे या आयोगा अंतर्गत येणाऱ्या सर्व जातींना विशेष लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. ओबीसी समाजाच्या मागील अनेक वर्षांपासून असलेल्या पेसा संदर्भातील मागणीवर विशेष लक्ष देवून न्याय मिळवून देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे, अशीही माहिती खा. नेते यांनी दिली आहे.
आदिवासी दुर्गम भागात वास्तव्याने असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे याकरीता केंद्र शासनाकडे ओबीसींसाठी स्वतंत्र वस्तीगृह देण्यात यावे, अशी मागणी केली होती. केंद्र शासनाने ही मागणी पूर्ण करून पहिल्या टप्प्यात ओबीसींसाठी स्वतंत्र चार वस्तीगृहे देण्याचे मान्य केले आहे. यापैकी एक गडचिरोली जिल्ह्यासाठी राहणार आहे. या वस्तीगृहाच्या जागेकरीता प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यासोबतच जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्के पूर्ववत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येत्या आठ दिवसात बैठक लावण्यात येणार आहे. या बैठकीत कुणबी समाज बांधवांच्या विविध समस्यांचे निवेदन घेवून सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण नेहमी कुणबी व ओबीसी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे यापुढेही उभे राहू. प्रसंगी समस्या सोडविण्यासाठी ओबीसी व कुणबी समाजाचे शिष्टमंडळ शासनदरबारी जाणार, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-26


Related Photos