महत्वाच्या बातम्या

 स्वच्छ वायू दिनानिमित्त चंद्रपुरात भव्य सायकल रॅली


- विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छ हवा–निरोगी जीवनचा संदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत स्वच्छ वायू दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरात जनजागृतीपर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ हवा–निरोगी जीवनचा संदेश देत खालसा स्कूल तसेच महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महापौर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त अकुनूरी नरेश, उपायुक्त संदीप चिद्रवार, सहाय्यक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, पंचबुद्धे, अमोल शेळके, संतोष गार्गेलवार, कुशल देशमुख यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सायकल रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शहरातील नागरिकांमध्ये वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि प्रदूषण नियंत्रणाबाबत जनजागृती केली. सायकल चालवा, प्रदूषण टाळा, स्वच्छ हवा–निरोगी जीवन, वायू प्रदूषण कमी करूया–चंद्रपूर निरोगी बनवूया’ अशा घोषणांद्वारे नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. पर्यावरणपूरक वाहतुकीचा वापर वाढविणे, सायकलला प्राधान्य देणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, अनावश्यक वाहनांचा वापर टाळणे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे तसेच कचरा उघड्यावर न जाळणे, असे आवाहन रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले.

राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाचा उद्देश शहरातील वायू प्रदूषण कमी करून नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे. यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना आणि जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. मात्र, वायू प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सायकल रॅलीला विशेष प्रतिसाद मिळाला. स्वच्छ हवा, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्त शहराचा संदेश देत विद्यार्थ्यांनी स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त चंद्रपूर’चा संकल्प व्यक्त केला. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी महानगरपालिकेच्या संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





  Print






Related Photos