गोंदिया-बालाघाट मार्गावर भीषण अपघात : सहा जण ठार, सात गंभीर जखमी


- रोजगाराच्या शोधात तेलंगणाकडे निघालेल्या मजुरांच्या बोलेरोला भरधाव ट्रकची धडक; मृतांमध्ये तीन वर्षांच्या बालकाचा समावेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधि / गोंदिया : रोजगाराच्या शोधात तेलंगणाकडे निघालेल्या मजुरांच्या बोलेरो वाहनाला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी ८ मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा गावाजवळ घडली. धडक एवढी भीषण होती की बोलेरो वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेमुळे बालाघाट जिल्ह्यातील चार गावांवर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, मृतांमध्ये अवघ्या तीन वर्षांच्या बालकाचा समावेश असून, रोजगारासाठी निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला.
रोजगारासाठी तेलंगणाकडे निघाले होते -
प्राप्त माहितीनुसार, मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील लोडामा, पिंपळगाव, सावरी आणि पलेरा या गावांतील मजूर रोजगारासाठी तेलंगणातील जगतीहाल, करीमनगर परिसरात जाण्यासाठी सोमवारी रात्री बोलेरो वाहन क्रमांक एमपी-१५ टी-३४९ मधून निघाले होते. वाहनात एकूण १३ जण प्रवास करीत होते. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजता गोंदिया तालुक्यातील नागरा गावाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने बोलेरोला जोरदार धडक दिली. अपघातानंतर बोलेरोचा पूर्णपणे चुराडा झाला. वाहनातील प्रवाशांमध्ये एकच हाहाकार उडाला.
सहा जणांचा मृत्यू -
या भीषण अपघातात आरुष मात्रे (३), किरण संतोष वैद्दे (२६), संतोष मात्रे (३८), सुशिला मात्रे (३५), रुपसेन सतकार (३५) आणि ज्योती सतकार (३२) यांचा मृत्यू झाला. मृत सर्वजण बालाघाट जिल्ह्यातील विविध गावांतील रहिवासी आहेत. मृतांमध्ये तीन वर्षांच्या आरुष मात्रे याचा समावेश असल्याने दुर्घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
सात जण गंभीर जखमी -
अपघातात भुमेश्वर दुलीचंद मात्रे (४७), राजेंद्र पंचाल (३०), लक्ष्मी पंचाल (२७), राकेश राजकुमार बाहे (२४), संदीप रुपलाल बाहे (३४) यांच्यासह अन्य जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक गावकरी तसेच या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. त्यानंतर गोंदिया ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी तातडीने केले मदतकार्य -
घटनेची माहिती मिळताच गोंदिया ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बोलेरोमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक वैभव पवार करीत आहेत.
पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू; पिता गंभीर -
या अपघातात बालाघाट जिल्ह्यातील सावरी खुर्द येथील भुमेश्वर दुलीचंद मात्रे यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले. भुमेश्वर हे मिस्त्रीचे काम करतात आणि दरवर्षी रोजगारासाठी तेलंगणात जातात. यावेळी ते पत्नी सुशिला मात्रे आणि तीन वर्षांचा मुलगा आरुष यांच्यासह रोजगाराच्या शोधात तेलंगणाकडे निघाले होते. मात्र नागरा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात सुशिला आणि आरुष यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर भुमेश्वर स्वतः गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मजुरांसोबत ठेकेदाराचाही प्रवास; तोही जखमी -
बालाघाट जिल्ह्यातील अनेक मजूर दरवर्षी रोजगारासाठी तेलंगणातील विविध भागांत जातात. याच पार्श्वभूमीवर लोडामा, पिंपळगाव, सावरी आणि पलेरा या चार गावांतील मजूर तेलंगणाकडे निघाले होते. मजुरांना घेऊन जाणाऱ्या या वाहनासोबत त्यांचा ठेकेदार संदीप बाहे देखील प्रवास करीत होता. अपघातात संदीप बाहे हेही गंभीर जखमी झाले आहेत. रोजगाराच्या शोधात घरापासून दूर निघालेल्या या मजुरांचा प्रवास नागरा गावाजवळ काळरात्रीत बदलला. या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, चार गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.




Petrol Price




