गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पारवा पोलिसांचे गणेश मंडळांना मार्गदर्शन


- ऑनलाइन परवानगीसह सीसीटीव्ही व स्वयंसेवकांची नियुक्ती; डीजे, लेझर लाईट व वादग्रस्त देखाव्यांना फाटा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : आगामी गणेशोत्सव व गोकुळाष्टमी उत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, तसेच उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पारवा पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस पाटील तसेच विविध गणेश मंडळांच्या अध्यक्ष व सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उत्सवाचे नियोजन, मंडप उभारणी, वाहतूक व्यवस्था, ध्वनिप्रदूषण, सुरक्षाव्यवस्था आणि सामाजिक सलोखा याबाबत मंडळांना सविस्तर सूचना देण्यात आल्या.
पारवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चौधरी यांनी गणेशोत्सव हा सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा उत्सव असल्याचे सांगितले. उत्सव साजरा करताना कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. सर्व गणेश मंडळांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ऑनलाइन परवानगी घेणे बंधनकारक -
गणेश मंडळांनी मंडप उभारण्यापूर्वी ऑनलाइन परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. परवानगीशिवाय मंडप उभारू नये, अशा सूचना देण्यात आल्या. मंडपाची उभारणी करताना रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, तसेच नागरिकांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहनांना अडथळ्याविना मार्ग उपलब्ध राहणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
रात्री दहा ते सकाळी सहा ध्वनिक्षेपक बंद -
उत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. त्याचबरोबर डीजे आणि लेझर लाईटचा वापर पूर्णपणे टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. उत्सवामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही, याची जबाबदारी संबंधित गणेश मंडळांनी घ्यावी, असेही सांगण्यात आले.
सीसीटीव्ही व २४ तास स्वयंसेवकांची व्यवस्था -
मंडप परिसरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर मंडप परिसरात २४ तास स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, गर्दीवर नियंत्रण ठेवावे आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, असे पोलिसांनी सांगितले.
वादग्रस्त देखावे टाळण्याचे आवाहन -
गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा वाढविणारा उत्सव असल्याने धार्मिक किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे वादग्रस्त देखावे सादर करू नयेत, असे आवाहन करण्यात आले. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारचे कार्यक्रम अथवा देखावे टाळावेत, अशी स्पष्ट भूमिका पोलिस प्रशासनाने मांडली.
मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांचा वापर -
गणेशमूर्तीच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीत गुलालाचा वापर न करता फुलांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच गणेशमूर्तीची उंची पाच फुटांपर्यंतच ठेवावी, असेही पोलिसांनी सांगितले.
विसर्जन मिरवणुकीसाठी अरुंद रस्त्यांमधून सहजपणे जाता येईल, अशाच वाहनांचा वापर करावा. मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा किंवा नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले.
पर्यावरणपूरक व सामाजिक उपक्रमांना प्राधान्य -
गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त ठरावा, यासाठी गणेश मंडळांनी पर्यावरण संवर्धन व सामाजिक प्रबोधनावर आधारित उपक्रम राबवावेत, असे आवाहन करण्यात आले. तसेच राज्यस्तरीय आदर्श गणपती मंडळ स्पर्धेत सहभागी होऊन पर्यावरणपूरक, सामाजिक आणि शिस्तबद्ध गणेशोत्सवाचा आदर्श निर्माण करावा, असेही पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, आगामी गणेशोत्सव व गोकुळाष्टमी उत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
या बैठकीस पारवा पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील तसेच विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्याची भूमिका यावेळी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.




Petrol Price




