महत्वाच्या बातम्या

 नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावरील गोळीबाराचा छडा : सात आरोपी अटकेत


- ५०० सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणातून पोलिसांना यश; मुख्य सूत्रधारासह पाच आरोपी अद्याप फरार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी /नागपूर : नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना अखेर यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना गुजरात आणि छत्तीसगडमधून अटक केली आहे. मात्र, गोळीबाराची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याच्यासह आणखी चार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी उपस्थित होते.

मध्यरात्री घरावर झाडली होती गोळी -
२६ ऑगस्टच्या मध्यरात्री नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर दुचाकीवरून दोन आरोपी आले होते. त्यापैकी एकाने घराच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी घराच्या गॅलरीच्या रेलिंगच्या काचेला लागून काचेला छिद्र पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नगरसेवकाच्या घरावर झालेल्या गोळीबारामुळे राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.मोटघरे यांच्या तक्रारीवरून भांडेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी समांतर तपास सुरू केला.

२०० हून अधिक गुन्हेगारांची झाडाझडती -
गोळीबारामागील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरातील ३० ते ४० वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित सुमारे २०० हून अधिक गुन्हेगारांची चौकशी व झाडाझडती घेतली. संशयितांच्या मोबाइल फोनचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यातून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले. तपासादरम्यान आरोपी गुन्हा केल्यानंतर गुजरात आणि छत्तीसगडमध्ये पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके दोन्ही राज्यांत रवाना करण्यात आली. गुरुवारी रात्री पोलिसांनी कारवाई करून सात आरोपींना जेरबंद केले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अंकुश झनक तोमस्कर, अमित मधुकर ठाकरे, रिषभ ऊर्फ छोट्या विशाल नागदेवे, रोमित ऊर्फ पुल्ल्या मुनेश्वर वाहने, कांचा ऊर्फ ऋषभ भगवती पैथल, केतन दुर्गाप्रसाद माटे आणि कार्तिक बबलू तोमस्कर यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना शुक्रवारी नागपूरला आणण्यात आले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइलमधील चॅटमधून सुपारीचे धागेदोरे -
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसला, तरी त्याने आपल्या मैत्रिणीच्या माध्यमातून आरोपींना गोळीबाराची सुपारी दिल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. अटक आरोपींच्या मोबाइल फोनमधील चॅट पोलिसांच्या हाती लागली आहे. या चॅटच्या आधारे गोळीबाराच्या कटामागील आर्थिक व्यवहाराचेही धागेदोरे मिळाले आहेत. सूत्रधाराने घटनेपूर्वी आरोपी अमित ठाकरेच्या माध्यमातून टोळीला ५० हजार रुपये दिल्याचा संशय आहे. उर्वरित रक्कम गोळीबाराची घटना घडल्यानंतर देण्याचे ठरले होते, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.

५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले -
आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील तब्बल ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्याचबरोबर आरोपींची ओळख आणि त्यांच्या हालचालींचा माग घेण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचीही मदत घेण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले. मात्र, मुख्य सूत्रधारासह त्याची मैत्रीण आणि आणखी तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याने तपासात अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांनी फरार आरोपींची नावे जाहीर करण्यास नकार दिला.

संघटित गुन्हेगारीच्या दिशेने तपास मकोका लागणार -
गोळीबाराचा कट संघटित पद्धतीने रचून गुन्हा घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे अटक आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या गुन्ह्याचा छडा लावण्यात गुन्हे शाखेचे एसीपी वैभव जाधव आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कामगिरीबद्दल पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी दिली.

एमडी तस्करीची माहिती दिल्याच्या संशयातून गोळीबार -
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून फल्ली नावाच्या कुख्यात गुन्हेगाराचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्याविरुद्ध तब्बल ४६ गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येते.शुभम मोटघरे हे फल्ली आणि त्याच्या साथीदाराच्या एमडी तस्करीची माहिती पोलिसांना देत असल्याचा संशय आरोपींना होता. याच कारणातून मोटघरे यांना ठार मारण्याऐवजी केवळ धाक निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या घरावर गोळीबार करण्याची सुपारी देण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, या बाबतचा अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

कुख्यात बावाजी च्या कार्यालयात कट रचल्याची चर्चा -
गोळीबाराचा कट नेमका कधी आणि कुठे रचण्यात आला, याबाबत पोलिसांच्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, कुख्यात मटकाकिंग बावाजी च्या कार्यालयात या कटाची आखणी झाल्याची चर्चा आहे. घटनेपूर्वी सर्व आरोपी तेथे एकत्र जमल्याचेही सांगितले जाते.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी विना क्रमांकाची दुचाकी रिषभ ऊर्फ छोट्या नागदेवे चालवत होता, तर अंकुश तोमस्कर याने मोटघरे यांच्या घरावर गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व बाबींची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. मुख्य सूत्रधार आणि फरार आरोपींना अटक झाल्यानंतर या गोळीबारामागील नेमके कारण, सुपारीचा संपूर्ण आर्थिक व्यवहार आणि कटातील इतर सहभागींची भूमिका अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.





  Print






Related Photos