साखरा परिसरात वाघाची दहशत : वैनगंगा नदीकाठावर ताज्या पाऊलखुणा, शेतकरी धास्तावले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : साखरा-काटली परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा मुक्त वावर सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैनगंगा नदीच्या किनारपट्टी भागात वाघाच्या ताज्या पाऊलखुणा आढळून आल्याने परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. शेतीच्या हंगामात वाघाचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
साखरा आणि काटली परिसरातील वैनगंगा नदीकाठच्या भागात मोठ्या प्रमाणात शेतजमीन आहे. नदीकाठचा हा भाग झाडी-झुडपांनी व्यापलेला असल्याने वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित अधिवास ठरत आहे. त्यामुळे वाघाने या परिसरात ठाण मांडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच आढळलेल्या ताज्या पाऊलखुणांमुळे ग्रामस्थांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
शेतीकामांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली -
सध्या शेतीची कामे जोरात सुरू आहेत. पिकांची निगा राखण्यासाठी शेतकरी आणि शेतमजुरांना दररोज पहाटेपासून शेतात जावे लागते. अनेक शेतकरी भल्या पहाटे शेताकडे रवाना होतात, तर दिवसभर शेतात काम करून सायंकाळी घरी परततात. मात्र, परिसरात वाघाचा वावर असल्याने शेतात जाणेही धोकादायक ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.विशेषत नदीकाठच्या शेतांमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना वाघाच्या अचानक हल्ल्याची भीती सतावत आहे. वाघ दाट झाडीत किंवा शेताच्या बांधालगत दबा धरून बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
वनविभागाने गस्त वाढविण्याची मागणी -
वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने साखरा-काटली परिसरात तातडीने गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वाघाचा नेमका वावर कोणत्या भागात आहे, याचा शोध घेण्यासाठी पाऊलखुणांचा मागोवा घेऊन आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.तसेच वाघाच्या हालचालींची माहिती मिळाल्यास ती तातडीने ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून शेतकरी व शेतमजूर सावधगिरी बाळगू शकतील, अशी मागणी होत आहे.
पहाटे शेतात जाणे धोकादायक -
वाघाचा वावर असलेल्या भागात नागरिकांनी विशेषत पहाटे आणि सायंकाळच्या वेळी एकट्याने जाणे टाळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी शक्यतो समूहाने शेतात जावे आणि परिसरात वाघ दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नये, अशी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
वैनगंगा नदीकाठच्या भागात ताज्या पाऊलखुणा आढळल्याने वाघाचा वावर प्रत्यक्षात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वनविभागाने परिस्थिती गांभीर्याने घेत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि साखरा-काटली परिसरातील शेतकरी व नागरिकांना सुरक्षिततेची खात्री द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.




Petrol Price




