पानटपरीत शिरलेल्या रानडुकराचा हल्ला : शेतकरी गंभीर जखमी आंबाडी येथील घटना , दोन ते तीन कर्मचारी किरकोळ जखमी, गावात भीतीचे वातावरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /भंडारा : भंडारा तालुक्यातील आंबाडी येथे दिवसाढवळ्या गावात शिरलेल्या रानडुकराने पानटपरीवर अचानक हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात शेतकरी शालिक राजीराम भुरे (५५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही पायांसह गुप्तांगाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच विदर्भ पाटबंधारे विभागातील दोन ते तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ पाटबंधारे विभागाच्या गोसे सिंचन कॉलनी परिसरातून एक रानडुक्कर थेट आंबाडी गावात शिरले. गावातील एका चहाटपरीवर काही कर्मचारी चहा-नाश्ता करीत असताना रानडुकराने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
याचवेळी शेतातील काम आटोपून घरी परतणारे शालिक भुरे हे पाणी पिण्यासाठी चहाटपरीवर थांबले होते. त्यांच्यावर रानडुकराने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिक आणि कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून पायावरील गंभीर जखमांवर टाके घालण्यात आले आहेत.
आठवडी बाजाराचा दिवस : मोठी दुर्घटना टळली -
घटनेच्या दिवशी आंबाडी येथे आठवडी बाजार भरला होता. मात्र दुपारची वेळ असल्याने बाजारात तुलनेने कमी गर्दी होती. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी रामलाल श्रावण भुरे यांनी दिली. आंबाडी हे वर्दळीचे गाव असून परिसरातील महिला मजूर आणि शेतकरी दररोज शेतात कामासाठी जातात. सध्या खरीप हंगामातील धान रोवणीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांची शेतात मोठी वर्दळ असते. दिवसाढवळ्या रानटी जनावरे गावात शिरून नागरिकांवर हल्ले करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वनविभागाकडे उपाययोजनांची मागणी -
शालिक भुरे हे कुटुंबातील कर्ते व्यक्ती असून त्यांच्या गंभीर दुखापतीमुळे कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.
तसेच वनविभागाने रानटी जनावरांचा बंदोबस्त करून नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
News - Bhandara




Petrol Price




