संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे सीबीएसई साऊथ झोन तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्कूलमध्ये शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सीबीएसई साऊथ झोन तायक्वांदो स्पर्धेचे भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन पार पडले. या स्पर्धेचे उद्घाटन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मानकचंदजी मालू हे उपस्थित होते. यावेळी सीबीएसई निरीक्षक ज्योती हंकारे यांच्यासह अतुल जाट, मुकुंद झाला, राजेंद्रजी चिकटे, गणेशजी चवले, प्रवीणजी चिमुरकर, बजरंगजी वानखेडे, दिगंबरजी खापणे, शाळेच्या प्राचार्या रानी पटेल तसेच उपप्राचार्या श्रद्धा चौबे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्पर्धकांना शुभेच्छा देत तायक्वांदोसारख्या शिस्त, आत्मविश्वास आणि आत्मसंरक्षणाची प्रेरणा देणाऱ्या क्रीडा प्रकाराचे महत्त्व अधोरेखित केले. अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळत असून विविध राज्यांतील खेळाडूंमध्ये मैत्री, बंधुभाव आणि क्रीडासंस्कृती अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या साऊथ झोन तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, दमण-दीव तसेच बेंगळुरू विभागातील विविध सीबीएसई संलग्न शाळांमधून सुमारे १,१०० खेळाडू आणि २०० प्रशिक्षक (कोचेस) सहभागी झाले आहेत. त्यामुळे वरोरा शहराला राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याचा मान मिळाला आहे.
स्पर्धेचे नियोजन आणि आयोजन यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातील अमोल आवारी, तहसीलदार यादव, पांडुरंग कुमरे, कोमल चांदेकर, घनश्याम खोंडे, सुमित बुटले आणि अनिल दगदाळ हे शिक्षक विशेष परिश्रम घेत आहेत. त्यांना शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेमुळे वरोरा शहरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून, स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्तरातून आयोजकांचे कौतुक होत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




