अंमल नाल्याला पूर : भोयेगाव–धानोरा मार्ग बंद

- वर्धा, पैनगंगा नदीच्या पुराचा फटका; ७ तालुक्यांतील १४ मार्गांवरील वाहतूक ठप्प, पिकांचे नुकसान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वर्धा आणि पैनगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे.
अंमल नाल्यालाही पूर आला असून पुराचे पाणी रस्ते आणि पुलांवरून वाहत असल्याने जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील १४ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
पुराचे पाणी थेट शेतशिवारात शिरल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कोरपना आणि बल्लारपूर तालुक्यांतील नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी साचले असून सोयाबीन, कापूस आणि इतर उभ्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
वर्धा नदीच्या पुरामुळे भोयेगाव–धानोरा मार्ग बंद -
वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर आणि कोरपना तालुक्यांना जोडणारा भोयेगाव–धानोरा मार्ग बंद करण्यात आला आहे. या मार्गावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे.
कोरपना परिसरात अंमल नाल्याला पूर आल्याने वनसडी–अंतरगाव, कढोली खुर्द–आवारपूर, राजुरगुडा–लालगुडा आणि कोडशी बुद्रुक या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. याचा मोठा परिणाम कोरपना, चंद्रपूर, मारडा, कवठाळा आणि भोयेगाव या भागातील बससेवेवर झाला आहे. पुरस्थितीमुळे शुक्रवारी ३१ जुलै तब्बल १३ गावांमध्ये बस पोहोचू शकली नाही.
विसापूर पुलावर पाणी; पोलिसांनी लावले बॅरिकेड्स -
विसापूर येथे वर्धा नदीच्या पुराचे पाणी किल्ला वॉर्डातून विसापूरकडे जाणाऱ्या पुलावरून वाहू लागल्याने शुक्रवारी दुपारपासून हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
तसेच बल्लारपूर–नांदगाव पोडे मार्गावर पाणी आल्याने विसापूर, नांदगाव पोडे आणि माना मार्गे चंद्रपूरकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. या मार्गावरून वाहनचालकांनी प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बल्लारपूर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून मार्ग बंद केले असून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
इरई धरणाची पाणीपातळी वाढली -
दरम्यान, इरई धरणाने २०५.९५० मीटर इतकी पाणीपातळी गाठली आहे. धरणातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता वीज केंद्राने व्यक्त केली आहे. त्यामुळे इरई नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इरई नदीच्या जलपातळीतही वाढ होत असून नदीकाठच्या नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बल्लारपूर नगरपरिषद सज्ज -
वर्धा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. पाण्याचा प्रवाह असाच कायम राहिल्यास बल्लारपूर शहरातील सखल भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे.
या संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बल्लारपूर नगरपरिषदेने पूर्वतयारी केली आहे. पूरग्रस्तांसाठी शाळांची व्यवस्था करण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशामक दल सज्ज ठेवण्यात आले आहे. याबाबतची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी दिली.
पुरामुळे बंद झालेले प्रमुख मार्ग -
जिल्ह्यात पुरामुळे बंद करण्यात आलेल्या मार्गांमध्ये
मूल : केळझर–चिरोली
गोंडपिपरी : सरांडी–वेजगाव
वरोरा : सोईट
भद्रावती : पळसगाव–कुचना, माजरी–विसलोन
राजुरा : सिंधी, नोकारी–गोवारीगुडा, चिंचोली–अंतरगाव
बल्लारपूर : काटवली–बामणी
कोरपना : भोयेगाव–धानोरा, भोयेगाव–गडचांदूर, इरई–भारोसा
या मार्गांवरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन -
जिल्ह्यातील वाढती पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांनी नदी-नाले, पूल आणि पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळावा. प्रशासनाने बंद केलेल्या मार्गांवरून वाहने नेऊ नयेत तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




