कारच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू : एक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वडसा : शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करून दुचाकीने गावी परतत असताना पावसामुळे दुचाकी घसरली. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना २९ जुलै रोजी रात्री सुमारे पावणे आठ वाजताच्या सुमारास आमगाव–सावंगी मार्गावरील नाल्याजवळ घडली.
या अपघातात प्रकाश विश्वनाथ नखाते ३५ वर्षे रा. गांधीनगर, ता. देसाईगंज यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले नंदू मारोती कावळे रा. गांधीनगर, ता. देसाईगंज हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश नखाते व नंदू कावळे हे २९ जुलै रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता एमएच-३३ एफ-१५२१ क्रमांकाच्या दुचाकीने शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी देसाईगंज येथे आले होते. साहित्य खरेदी करून गावी परतत असताना आमगाव–सावंगी मार्गावरील नाल्याजवळ पावसामुळे त्यांची दुचाकी घसरली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर कार प्रकाश नखाते यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले; मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातात नंदू कावळे हेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण आणि कारचालकाची जबाबदारी याबाबत पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे गांधीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




