सेवा महोत्सव २०२६ अंतर्गत कर्तबगार महिलांच्या बचत गटातर्फे गौरवपूर्ण सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा महोत्सव २०२६ अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा बचत गटाच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात शिक्षण, सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण, स्वयंरोजगार, आरोग्य, कृषी आणि विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या महिलांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. समाजात महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी आपल्या मनोगतात महिलांचे समाज आणि कुटुंब घडविण्यातील योगदान अधोरेखित केले. महिला सक्षम झाल्यास कुटुंब, समाज आणि राष्ट्र अधिक बळकट होते, असे सांगत त्यांनी महिलांनी विविध क्षेत्रांत आत्मविश्वासाने पुढे येऊन नेतृत्व करावे, असे आवाहन केले.
बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला असून रोजगारनिर्मिती, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा महिलांचा गौरव करणे म्हणजे त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याबरोबरच इतर महिलांनाही प्रेरणा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, ॲड. प्रणोती सागर निंबोरकर नगराध्यक्ष नगरपरिषद गडचिरोली, रेखा डोळस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महिला मोर्चा, योगिता पिपरे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष, वर्षा शेडमाके महिला मोर्चा जिल्हा प्रभारी, सीमा कन्नमावार नगसेविका तथा महिला बालकल्याण सभापती, ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री अर्चना बोरकुटे व तसेच लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, बचत गटांच्या पदाधिकारी, महिला सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




