अंमली पदार्थांच्या संशयावरून ट्रॅव्हल्सवर रामनगर पोलिसांची धाड : श्वानपथकासह कसून झडती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरात अंमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी रामनगर पोलिसांनी शनिवारी २५ जुलै रोजी रात्री नागपूर-हैदराबाद मार्गावर धावणाऱ्या डी.एन.आर. ट्रॅव्हल्स बसवर धाड टाकून सखोल तपासणी केली. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत प्रशिक्षित श्वानपथक तसेच पथकांनी बसची कसून झडती घेण्यात आली. मात्र, तपासणीत कोणताही अंमली पदार्थ अथवा संशयास्पद माल आढळून आला नाही.
रामनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना संबंधित ट्रॅव्हल्समधून अंमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने नियोजनबद्ध कारवाई केली.
चंद्रपूर येथे बस पोहोचताच प्रशिक्षित श्वानांच्या मदतीने वाहनाची सखोल तपासणी करण्यात आली. मात्र, माहितीतील दाव्यानुसार कोणताही प्रतिबंधित किंवा संशयास्पद माल मिळून आला नाही. त्यानंतर आवश्यक कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
रामनगर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, आंतरजिल्हा तसेच आंतरराज्य मार्गांवर धावणाऱ्या ट्रॅव्हल्समधून अंमली पदार्थ, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ किंवा इतर अवैध वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार आहे. नागरिकांनी अशा प्रकारची कोणतीही माहिती तात्काळ रामनगर पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात सपोनि शिवाजी नागवे, सपोनि हनुमान उगले, पोउपनि कृष्णा दराडे, सफौ प्रकाश बल्की, पोहवा आनंद खरात, पोहवा बाबा नैताम, पोहवा रामप्रसाद नैताम, पोहवा जितेंद्र आकरे, पोहवा रवि ढेंगळे, मपोहवा मनीषा मोरे, पोअं. प्रकाश मडावी, पोअं. पंकज ठोंबरे, पोअं. संदीप गेडाम, पोअं. सुरेश कोरवार, पोअं. पंकज पोंदे आणि मपोशि ब्ल्युटी साखरे यांनी केले.
रामनगर पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात आपली मोहीम आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, गुप्त माहितीच्या आधारे अशा धाडसत्रांना आगामी काळातही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




