महत्वाच्या बातम्या

 भामरागडचा मुख्य मार्ग पूलकामाच्या मातीने खराब


- सार्वजनिक विश्रामगृह शाळा आणि आठवडी बाजाराकडे जाणारा रस्ता चिखलमय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : शहरातील नवीन पुलाच्या बांधकामादरम्यान फिलरच्या कामासाठी करण्यात आलेल्या खोदकामातील माती मुख्य रस्त्यावर पसरल्याने राजे धर्मराव हायस्कूल, सार्वजनिक विश्रामगृह तसेच आठवडी बाजाराकडे जाणारा मार्ग पूर्णपणे चिखलमय झाला आहे.

या प्रकारामुळे शाळकरी विद्यार्थी, पालक, व्यापारी आणि नागरिकांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

आठवडी बाजाराच्या दिवशी परिस्थिती अधिक गंभीर होते. भाजीपाला आणि इतर साहित्य घेऊन परतणाऱ्या नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ता घसरडा झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळ्यात ही समस्या आणखी वाढण्याची शक्यता असून संबंधित कंत्राटदार व प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील माती हटवून वाहतुकीसाठी मार्ग सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos