महत्वाच्या बातम्या

 वासेरा येथे आदर्श भरारी महिला प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे आदर्श भरारी महिला प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ग्रामपंचायत सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी मेघा कामडी या होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत स्वागतगीत सादर करून तसेच पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक प्रभागसंघाच्या सचिव निता तुम्में यांनी केले. त्यांनी संघाच्या कार्यवाहीचा आढावा सादर करत आगामी उपक्रमांची रूपरेषा स्पष्ट केली.

यानंतर तालुका व्यवस्थापक कामडी मॅडम यांनी महिलांना विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. पशुसंवर्धन विभागाचे हर्षद रामटेके यांनी पशुसंवर्धनाशी संबंधित योजनांची माहिती देत महिलांना याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

प्रभाग समन्वयक दरडे सर यांनी विविध अभियानांची माहिती देत लखपती दीदी या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच प्रभागसंघ लिपिका जिजा धारणे यांनी सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाचा जमा-खर्च, नफा-तोटा व ताळेबंद सादर करून त्यास मंजुरी मिळवली.

सभेत सन २०२६-२०२७ या नवीन आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक वाचन करण्यात आले. तसेच २०२५-२०२६ या वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल सादर करून त्यास मान्यता देण्यात आली. प्रभागसंघाच्या व्यवसाय आराखड्यासही मंजुरी देण्यात आली.

अध्यक्षीय भाषणात मेघा कामडी यांनी महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी शासकीय योजनांचा प्रभावी वापर करून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. त्यांनी कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.

कार्यक्रमाचे संचालन वैशाली चावरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अर्चना शेंडे यांनी केले. या सभेला ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव, समूहातील सर्व महिला सदस्य, कॅडर तसेच मानकर सर, रामटेके सर आणि लोधे सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली.





  Print






News - Chandrapur




Related Photos