उसने रक्कम परत मागितल्याचा राग : विटेने डोक्यात वार करून तरुणाला केले जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : उसने दिलेले ३५ हजार रुपये परत मागितल्याच्या कारणावरून एका मजूर तरुणावर विटेने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बल्लारपूर शहरात घडली. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शाम अमरसिंग राजपूत (वय २३), रा. शांतीनगर, बल्लारपूर हे रेल्वे स्थानक परिसरात मजुरीचे काम करतात. त्यांची ओळख असलेल्या गुलाम रजीक याने २५ जून रोजी तातडीच्या कामासाठी ३५ हजार रुपये उसने मागितले होते. विश्वासाने शाम यांनी पत्नीला न सांगता घरात ठेवलेली रक्कम त्याला दिली होती.
दुसऱ्या दिवशी, २६ जून रोजी शाम राजपूत यांनी पैसे परत मागण्यासाठी गुलाम रजीकच्या घरी भेट दिली. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ करून त्यांना हाकलून दिले.
यानंतर दुपारच्या सुमारास अंदाजे दुपारी २.०० ते २.३० वाजताच्या दरम्यान शाम राजपूत हे आपल्या मुलासाठी आईस्क्रीम घेऊन रेल्वे चौकातून घरी परतत असताना गुलाम रजीक व त्याचा साथीदार राजू यांनी त्यांना अडविले. दोघांनी मिळून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर गुलाम रजीक याने जवळ पडलेली विट उचलून शाम यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला.
घटनास्थळी परिसरातील नागरिक जमा होताच दोन्ही आरोपी तेथून पसार झाले. या घटनेमुळे फिर्यादीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी आरोपी गुलाम रजीक व राजू यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




