विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी छात्रों की गूंज युवा संमेलन २७ जूनला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधील कथित अनियमितता, पेपरफुटीच्या घटना, भरतीतील विलंब तसेच वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी छात्रों की गूंज – युवांच्या समस्यांचे संमेलन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थी संघटना, चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित हे संमेलन २७ जून रोजी दुपारी १ वाजता सीडीसीसी बँक हॉल, चंद्रपूर येथे होणार आहे. देशभरात NEET, UGC-NET, MPSC, SSC-CGL, रेल्वे भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना समोर आल्याने लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक भविष्य धोक्यात आल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे. तसेच भरती प्रक्रिया पूर्ण होण्यास होणारा विलंब, निकाल जाहीर करण्यात होणारी दिरंगाई आणि नियुक्ती प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे युवकांमध्ये नाराजी वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित संमेलनात विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि युवकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुरक्षित व पारदर्शक परीक्षा प्रणाली, पेपरफुटीविरोधात कठोर कारवाई, वेळेत भरती प्रक्रिया पूर्ण करणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उपलब्धता आणि रोजगाराच्या संधी वाढविणे या विषयांवर चर्चा होणार आहे.
संमेलनात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी प्रतिनिधी, स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होऊन युवकांच्या प्रश्नांवर सखोल विचारमंथन करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या भावना व मागण्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
आमची परीक्षा सुरक्षित असावी, भरती प्रक्रिया पारदर्शक असावी आणि प्रत्येक युवकाला रोजगाराचा न्याय्य अधिकार मिळावा, या प्रमुख मागण्यांसह युवकांचा एकत्रित आवाज या संमेलनातून उमटणार आहे. जब युवा जागेगा, तभी भविष्य बदलेगा या घोषवाक्याखाली आयोजित कार्यक्रमास जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यार्थी संघटना, चंद्रपूर यांनी केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




