महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत १७ वर्षीय अल्पवयीनाचा मित्राच्याच हातून निर्घृण खून : आरोपीने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील डोंगरगाव परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतकाचे नाव बादल नकटुजी कोसनकर (१७, रा. डोंगरगाव) असून, आरोपीही अल्पवयीन आहे आणि मृतकाचा मित्र आहे.

तपासात निष्पन्न झाले आहे की, काही दिवसांपूर्वी बादलने आरोपीच्या बहिणीबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता. या रागाच्या वेदनेतून आरोपीने बादलचा खून करण्याचा कट रचला.

घटनादिवशी, बुधवारी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास, आरोपीने बादलला गांजा ओढण्यासाठी जाऊया असे सांगून गडचिरोली-गुरवाळा मार्गावरील दाट जंगलात नेले. जंगलात पोहोचल्यावर वडिलांनी घरी बोलावले असल्याचे सांगून काही वेळाने दोघेही परत निघाले, परंतु नंतर आरोपीने मागून बादलवर कुऱ्हाडीने वार केले. डोक्यावर आणि पाठीवर सलग वार केल्यामुळे बादल गंभीर जखमी झाला, आणि वार इतके भयंकर होते की कुऱ्हाड त्याच्या डोक्यात अडकली आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी स्वतः गडचिरोली पोलीस ठाण्यात पोहोचला आणि पैसे देणे-घेण्याच्या वादातून तीन अनोळखी व्यक्तींनी बादलचा खून केला असल्याची खोटी तक्रार दाखल केली. मात्र, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आणि आरोपीच्या जबाबातील विसंगती लक्षात घेतली. त्यानंतर मोबाईल चॅटिंग आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला कबूल करण्यास भाग पाडले.

गडचिरोली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम १०३(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पूजा नैताम, प्रवीण बुंदे आणि त्यांच्या पथकाने तपास केला. दोघेही अल्पवयीन असल्यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये वाढती हिंसक प्रवृत्ती आणि गुन्हेगारी मानसिकतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos